पंजाबमध्ये एक मोठी जादू झाली आहे. लाखो रुपयांची विकासकामे केलेला गावच गायब झाला आहे. २०१८-१९ मध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत मिळून असा गाव तयार केला की तो प्रत्यक्षात नव्हताच. आता हे उघड झाले आहे.
या गावामध्ये विविध विकासकामांसाठी ४३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. न्यू गट्टी राजो नावाचा हा गाव असून याचे लोकेशन सरकारी कागदपत्रांमध्ये गट्टी राजोच्या जवळ म्हणून दाखविण्यात आले आहे. गुगल मॅपही या गावाचा पत्ता सांगू शकलेला नाही. फिरोजपूर जिल्ह्यातील एडीसी विकास कार्यालयामध्ये हा भ्रष्टाचाराचा प्रकार घडला आहे.
हा गाव भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय लाईनवर दाखविण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि ब्लॉक समिती सदस्य गुरदेव सिंग पीर इस्माइल खान हे या मुळ गावाचे रहिवासी आहेत. त्यांना यात काळेबेरे दिसल्याने पंजाब सरकारकडून गट्टी राजो पंचायतीची माहिती मिळविली. खऱ्या पंचायतीला कमी अनुदान आणि विकास प्रकल्प मिळाले, तर बनावट गावाला जवळजवळ दुप्पट रक्कम मिळाली.बीडीपीओ कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी स्थानिक एडीसी विकास कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून त्याच नावाची बनावट पंचायत तयार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे पंजाबी आणि इंग्रजी नावांमधील गोंधळामुळे ही समस्या निर्माण झाली, असे एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले. अनुदानाचा योग्य वापर झाल्याचा दावा त्यांनी केला. परंतू, पंजाबी नावे असलेल्या गावांसाठी आणि इंग्रजी नावे असलेल्या गावांसाठी वेगवेगळे अनुदान कसे मंजूर केले गेले, यावर हा कर्मचारी काही सांगू शकलेला नाही. या प्रकरणी आता चौकशी सुरु झाली आहे.