महाकुंभमध्ये स्नान केल्यानंतर लंग्स इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचं देखील म्हटलं जात आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. डॉ. दीपशिखा घोष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. तिला व्हेंटिलेशन आणि प्रोन पोझिशनवर ठेवण्यात आलं आहे असं सांगितलं.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एनजीटीला प्रयागराजमधील गंगा-यमुनेचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य नाही असा रिपोर्ट आल्यानंतर आता डॉक्टरांनी हा इशारा दिला आहे. सीपीसीबीने ७३ ठिकाणांहून पाण्याची चाचणी केल्यानंतर एनजीटीला अहवाल सादर केला.
डॉ. दीपशिखा घोष म्हणाल्या की, त्यांच्याकडे एक रुग्ण आली होती जिच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाला होता. कुंभमेळ्यात स्नान करताना पाणी तिच्या नाकात गेलं. ती आता स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही. धर्म हा आपल्यासाठी श्रद्धेचा विषय आहे आणि तो महत्त्वाचा देखील आहे पण आपण विज्ञानावरही विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सतर्क राहा.
डॉ. घोष यांनी 'द लिव्हर डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. सिरिएक एबी फिलिप्स यांच्या सोशल मीडियावरील पोस्टचा देखील उल्लेख केला. त्यांच्या पोस्टमध्ये, डॉ. फिलिप्स यांनी प्रयागराज येथील गंगा नदीत बॅक्टेरिया असल्याचं म्हटलं आहे.
CPCB काय आहे रिपोर्ट?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रिपोर्टमध्ये गंगा-यमुना नदीच्या पाण्याची ६ पॅरामीटर्सवर चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये pH म्हणजेच पाणी किती आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी आहे, फेकस कोलिफॉर्म, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD), केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) आणि डि़जॉल्व्हड ऑक्सिजन यांचा समावेश आहे.
बहुतेक ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांमध्ये फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळून आलं. इतर ५ पॅरामीटर्सवरील पाण्याची गुणवत्ता मानकांनुसार आहे. जास्त प्रमाणात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरियामुळे मळमळ, उलट्या, अतिसार, टायफॉइड, कॉलरा, त्वचारोग आणि इतर गंभीर संसर्ग होतात.
डॉ. दीपशिखा यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिले - कदाचित महिलेला स्नान कसं करावं हे माहित नसेल. तुम्हाला तुमचं नाक आणि तोंड बंद करावं लागतं. तर अनेकांना हे समजल्यावर थोडा धक्का बसला आहे.