नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद स्वीकारणार असल्याचे वृत्त म्हणजे पूर्णपणो अटकळबाजी आणि निराधार अफवा आहेत, असे प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षात मी विविध पदे स्वीकारणार असल्याच्या अटकळी सातत्याने सुरू आहेत. ज्या पद्धतीने हा विषय समोर आणण्याची संधी साधली जात आहे ते चुकीचे आहे, असे त्या एका संक्षिप्त निवेदनात म्हणाल्या.
प्रियंका गांधी अ.भा. काँग्रेसच्या सरचिटणीस किंवा उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष बनून राजकारण प्रवेशाचा श्रीगणोशा करतील, अशी चर्चा सुरू झाली असतानाच त्यांनी निवेदन जारी केले आहे. गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी पक्षात नेतृत्वाची भूमिका बजावावी असे काँग्रेसला वाटत असल्याचे प्रवक्त्या शोभा ओझा यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर तर्कवितर्काना उधाण आले. देशभरातील प्रत्येकाला गांधी कुटुंबातील सर्वानी राजकारणात यावे असे वाटते. ‘‘हम चाहते है की तीनो पार्टी की कमान संभाले’’ असे विधान ओझा यांनी केले होते. गांधी कुटुंबाचे निष्ठावान ऑस्कर फर्नाडिस यांनी बुधवारी केलेल्या विधानानेही त्यात भर पडली होती.
अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांतील प्रचारापुरती किंवा बंदद्वार बैठकींना हजेरी लावून पक्षांच्या डावपेचांमध्ये सहभागी होण्यापुरती प्रियंका गांधी यांची भूमिका सीमित राहिली असून, अलीकडेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेस कार्यकत्र्याकडून प्रियंका गांधी यांनी मोठी भूमिका बजावावी यासाठी दबाव वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी अलाहाबादमध्ये ‘काँग्रेस का मून, प्रियंका कमिंग सून’ असे पोस्टर झळकले होते.