ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २२- स्वीत्झर्लंड सरकारने स्विस बँकांमध्ये काळा पैसा जमा करणा-या भारतीय खातेधारकांची यादी तयार केली असून लवकरच ही यादी भारत सरकारकडे सोपवण्यात येणार आहे. काळा पैशाविरोधात भारताच्या लढाईत ही यादी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
मोदी सरकारने पहिले टार्गेट काळा पैशाला केले असून यासंदर्भात केंद्र सरकारने विशेष तपास पथक नेमले आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी स्विस सरकारमधील एका वरिष्ट अधिका-याने स्विस बँकांमधील भारतीय खातेदारांची यादी तयार केल्याची माहिती दिली. या खातेधारकांनी कर चुकवण्यासाठी स्विस बँकांमध्ये पैसे जमा केल्याचा संशय आहे असे या अधिका-याने सांगितले. मात्र या खातेधारकांची नावे जाहीर करण्यास त्या अधिका-याने नकार दिला. स्विस सरकार भारतातील नवनियुक्त सरकारसोबत काम करण्यास इच्छूक असून काळा पैशासंदर्भात भारत सरकारने नेमलेल्या चौकशी समितीला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु. लवकरच या संशयित खातेधारकांची यादी भारताकडे सोपवू असे त्या अधिका-याने स्पष्ट केले.
स्वीत्झर्लंडमधील २८३ बँकांमध्ये परदेशी खातेधारकांनी तब्बल १,६०० अब्ज डॉलर्स जमा केले असून यात भारतातील तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा समावेश आहे. काळापैशासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख न्या. एम.बी. शाह यांनी या निर्णयाचे स्वागत केले. स्विस बँकांनी यादी दिल्यावर संबंधितांवर कठोर कारवाई करता येईल असे त्यांनी सांगितले.