नवी दिल्ली- धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. दिल्लीपासून गुरुग्रामपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. जवळपास 6 किलोमीटरपर्यंत या रांगा असल्यानं वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. या वाहतूक कोंडीत तासन्तास वाहनं अडकून पडली आहेत. तर राष्ट्रीय महामार्ग 8वरही महिपालपूर आणि गुरुग्रामच्या उद्योग विहारपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आहे.दिवाळीनिमित्त लोक खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. नवी दिल्लीतल्या चांदणी चौक, करोल बाग, लाजपत नगर आणि साऊथ एक्सटेन्शनमध्ये गाड्या कासवगती चालत आहेत. दिल्लीच्या ट्रॅफिक पोलिसांनी दिवाळीच्या निमित्त जवळपास 4 हजार पोलिसांना तैनात केलं आहे. त्यानंतरही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे. या वाहतूक कोंडीचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.
दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी, 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 21:37 IST