शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

‘त्यांची’ इच्छा पूर्ण होणार नाही!

By रवी टाले | Updated: June 11, 2023 10:50 IST

आज पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ मूळ धरीत असल्यासारखे दिसत असले तरी, भारतातील शीख समुदायातील फार थोड्या लोकांची त्या चळवळीला सहानुभूती आहे. ही चळवळ प्रामुख्याने युरोप, अमेरिका व कॅनडातील शीख समुदायापुरती मर्यादित आहे.

रवी टाले, कार्यकारी संपादक, जळगाव.

खलिस्तान चळवळीचा विंचू हल्ली पुन्हा एकदा नांगी वर काढू लागला आहे. चार दशकांपूर्वी या विंचवाने भारतभूमीला अनेक डंख केले.  माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी केलेली हत्या हादेखील खलिस्तानी दहशतवादाचाच परिपाक होता. त्यांचे नातू राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या एका कार्यक्रमात खलिस्तान समर्थकांनी बराच गोंधळ घातला. अगदी परवाच्या दिवशी कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थकांनी एक मिरवणूक काढत इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवला. काँग्रेस आणि भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅकाय यांनी या प्रकाराचा निषेधदेखील केला. खलिस्तानी दहशतवाद्यांनी १९८०च्या दशकात केवळ पंजाब नव्हे, तर उर्वरित भारतातही केलेली दहशतवादी कृत्ये, सुवर्ण मंदिरात राबविलेले ऑपरेशन ब्लू स्टार, त्याचा बदला म्हणून झालेली इंदिरा गांधी यांची हत्या, पाठोपाठ देशभरात उफाळलेला हिंसाचार, हा सर्व काळा अध्याय इतिहासाचा भाग बनला असताना, खलिस्तान चळवळ पुन्हा मूळ धरते की काय, अशी शंकेची पाल अलीकडे चुकचुकू लागली आहे.

अमृतपाल सिंग नामक स्वयंघोषित धर्मगुरूने काही दिवसांपूर्वी पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमधील पोलिस आणि केंद्रीय तपास संस्थांच्या नाकात दम आणला होता. सध्या आसाममधील कारागृहात टाचा घासत असलेला अमृतपाल  स्वत:ची तुलना जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्याशी करतो. भिंद्रनवालेने १९८०च्या दशकात खलिस्तानी चळवळीचे नेतृत्व केले होते आणि त्याचा उपद्रव संपुष्टात आणण्यासाठीच १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार राबवावे लागले होते. अमृतपालचा उदय दीप सिंधू या अभिनेत्याच्या अपघाती मृत्यूनंतर झाला. सिंधूनेच वारिस पंजाब दे ही संघटना स्थापन करून पंजाबात पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला होता. सिंधू जिवंत असताना आणि अमृतपालला अटक होण्यापूर्वी, पंजाबात १९८०च्या दशकातील दिवस पुन्हा परततात की काय, अशी भीती वाटू लागली होती. आता तशी परिस्थिती नसली तरी, विदेशी भूमीत मात्र खलिस्तानचे समर्थक त्यांचे उपद्रव मूल्य दाखवून जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अधूनमधून करीत असतात. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात घातलेला गोंधळ हा त्याचाच भाग होता. 

ब्रिटिश राजवटीच्या काळात  खलिस्तान या शीर्षकाची एक पत्रिका १९४०मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये सर्वप्रथम खलिस्तान या शीख समुदायासाठीच्या स्वतंत्र देशाची संकल्पना मांडण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर भारताचे धार्मिक आधारावर विभाजन करून मुस्लीम आणि शीख समुदायांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याची कल्पना आगेमागेच जन्माला आली. त्यापैकी पाकिस्तान हा देश अस्तित्वात आला. बांगलादेश युद्धानंतर पाकिस्तानने खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालण्यास प्रारंभ केला. युरोप, अमेरिका आणि कॅनडातील आर्थिकदृष्ट्या भक्कम स्थलांतरित शीख समुदायातील काही जणांनी त्या चळवळीला वित्त पुरवठा करण्यास प्रारंभ केला. पंजाबची सीमा पाकिस्तानला लागून असल्याने वाट चुकलेल्या तरुणांना पाकिस्तानात नेऊन दहशतवादाचे प्रशिक्षण देणे सोपे होते. त्यातूनच १९७० व १९८०च्या दशकात खलिस्तानी चळवळीने मूळ धरले.

भूतकाळात पंजाबात हिंदू बहुसंख्य होते. अगदी फाळणीनंतर पाकिस्तानी पंजाबातून मोठ्या संख्येने शीख बांधवांचे भारतात स्थलांतर झाल्यानंतरही ही स्थिती कायम होती. शीख म्हणजे पंजाबी आणि पंजाब म्हणजे शीखबहुल प्रांत, असे समीकरण त्या काळात अजिबात नव्हते. शिखांचा धर्मग्रंथ गुरू ग्रंथ साहिबमध्ये उत्तर व दक्षिण भारतातील अनेक संतांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळांपैकी हजूर साहिब महाराष्ट्रात, तर तख्त श्री पटना साहिब बिहारमध्ये आहे. स्वातंत्र्य व फाळणीची चाहुल लागली तेव्हा भारतात हिंदूंचे आणि पाकिस्तानात मुस्लिमांचे प्राबल्य असेल, हे तत्कालीन शीख नेत्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर पंजाब शिखांचा आणि शीख पंजाबचे अशी मांडणी सुरू झाली. त्यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणी पुढे आली. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी, आता भारतात खलिस्तानी चळवळीला थारा मिळणे शक्य नाही!