Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आले. सीमाप्रश्नाचे पडसाद लोकसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. याला कर्नाटकच्या भाजप खासदाने प्रत्युत्तर देत महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, सत्ता गेल्यावर असे वर्तन सुरू केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. हे चालणार नाही. हा देश एक आहे. अमित शाह यांना विनंती आहे की, त्यांनी यावर काहीतरी बोलावे. या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. यानंतर कर्नाटक भाजपचे खासदार शिवकुमार उदासी विरोधकांवर पलटवार केला.
महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना
सुप्रिया सुळेंसह अन्य खासदार आक्रमक होत असताना, कर्नाटकमधील हवेरी मतदारसंघाचे भाजप खासदार शिवकुमार उदासी यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते नेहमीच अशा प्रकारे वर्तन करतात. जेव्हा ते सत्तेतून पायऊतार झाले आहेत, तेव्हापासून अशा प्रकारे वर्तन करत आहेत. महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून, विरोधकांनी यावर बोलू नये, अशा सांगत उदासी यांनी सुप्रिया सुळे आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करत सगळ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. याशिवाय सुप्रिया सुळेंची मागणी फेटाळून लावत, दोन राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र सरकार काय करणार? ही संसद आहे. हे अजिबात चालणार नाही, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"