Vinod Kumar Shukla: हिंदी साहित्य विश्वातील दिग्गज साहित्यिक आणि 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विनोद कुमार शुक्ल यांचे मंगळवारी (23 डिसेंबर 2025) सायंकाळी निधन झाले. श्वसनासंबंधी त्रासामुळे त्यांना 2 डिसेंबर रोजी रायपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी 4.58 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते.
पीटीआयच्या माहितीनुसार, विनोद कुमार यांचा मुलगा शाश्वत शुक्ल यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2025 मध्ये श्वसनाचा त्रास वाढल्यानंतर विनोद कुमार शुक्ल यांना रायपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, 2 डिसेंबर रोजी प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. शुक्ल यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
साहित्यविश्वातील दिले अमूल्य योगदान
‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ आणि ‘एक चुप्पी जगह’ यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांमधून सामान्य माणसाच्या आयुष्यातील सूक्ष्म भावविश्व मांडणारे विनोद कुमार शुक्ल हे हिंदी साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्व होते. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबरीसाठी त्यांना 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (माजी ट्विटर) वर शोक व्यक्त करत म्हटले की, “ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. हिंदी साहित्याला दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील. या दुःखाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ॐ शांती.”
छत्तीसगडसाठी मोठी हानी : मुख्यमंत्री विष्णुदेव साय
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी त्यांच्या निधनाला राज्यासाठी मोठी साहित्यिक हानी असल्याचे म्हटले आहे. “साध्या जीवनाला साहित्यिक गौरव देणाऱ्या विनोद कुमार शुक्ल यांचे जाणे ही छत्तीसगडसाठी अपूरणीय हानी आहे. त्यांच्या संवेदनशील रचना पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्यिक कारकिर्दीला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यात साहित्य अकादमी पुरस्कार, गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, राष्ट्रीय मैथिलीशरण गुप्त सम्मान, रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार, शिखर सम्मान आणि ज्ञानपीठ पुरस्कार यांचा समावेश आहे.
Web Summary : Renowned Hindi litterateur and Jnanpith awardee, Vinod Kumar Shukla, passed away at 89 due to respiratory issues. His notable works include 'Naukar ki Kameez'. PM Modi and Chhattisgarh CM expressed condolences, recognizing Shukla's invaluable contribution to literature and inspiration to future generations.
Web Summary : ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित हिंदी साहित्यकार विनोद कुमार शुक्ल का 89 वर्ष की आयु में निधन हो गया। 'नौकर की कमीज' उनकी प्रसिद्ध रचना है। पीएम मोदी और छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री ने शोक व्यक्त किया, और साहित्य में उनके योगदान को सराहा।