झारखंड: झारखंडमध्ये एकूण पाच टप्प्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, अजूनही तीन टप्पे बाकी आहे. तर याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंडमध्ये प्रचारसभेतून काँग्रेस नेते राहुल गांधीनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला. केंद्रात 10-15 उद्योगपतींच सरकार आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानी यांच्या गळाभेटी घेतात. तसेच मोदींना टीव्हीवर दाखवण्यासाठी उद्योगपतींकडून पैसा दिला जात असल्याचे आरोप सुद्धा राहुल गांधींनी केले.
राहुल गांधी हजारीबाग येथील बड़कागांवच्या प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी मोदींवर टीका केली. मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. रोजगार मिळाला का? मेक इन इंडिया पूर्ण झाले. असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगार तरुण एका राज्यातून दुसर्या राज्यात जात आहेत. भाजपाचे लोक जेथे जेथे जातात तेथे लोकांना घाबरवतात. देशात एक द्वेषाचं वातवरण निर्माण झालं असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
तर केंद्रातील सरकार मोदी नव्हे तर 10-15 उद्योगपती चालवत आहे. मात्र आपले पंतप्रधान हे अदानी-अंबानी यांच्या गळाभेटी घेण्यात व्यस्त आहे. तसेच टीव्हीवर नेहमी दिसणारे पंतप्रधान फुकट दिसत नसून, त्यासाठी उद्योगपती पैसे देत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा यावेळी राहुल गांधीनी मोदींवर केला.
झारखंडमध्ये तिसऱ्या टप्यात 17 जागांवर मतदान होणार आहे. एकूण पाच टप्प्यात मतदान होणाऱ्या झारखंडमध्ये आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले आहे. तर 20 डिसेंबरला शेवटच्या टप्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुद्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.