वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेले सुमारे ३५०० लोकसंख्या असलेले जयापूर गाव आता दुस-यांदा विजयोत्सव साजरा करीत आहे. ४५० वर्षांपूर्वी पहिला विजयोत्सव साजरा करणाऱ्या या गावाच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा मिळाला आहे. इतिहासात या गावाचा असलेला उल्लेख मोगल काळात घेऊन जातो. शुक्रवारी मोदींनी हे गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली तेव्हा ब्रेकिंग न्यूज बनली आणि हे गाव नव्याने प्रकाशझोतात आले. १७ व्या शतकात मोगल सम्राट औरंगजेबाने मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी त्याच्या सैनिकांचे लक्ष जयापूरच्या हनुमान मंदिराकडे गेले होते. या मंदिरातील ‘काळा हनुमान’ हे या परिसरातील अनोखे वैशिष्ट्य होते. अजूनही या मंदिराची ओळख ‘काले हनुमान का मंदिर’ अशीच आहे. मोगलांच्या सैन्याने या गावाला वेढा घातल्यानंतर गावकऱ्यांनी निकराची झुंज देत त्यांना पळता भुई थोडी केली होती, अशी माहिती बनारस हिंदू विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. पी. के. मिश्रा यांनी दिली. २००३ मध्ये या गावातील जवान अजयकुमार सिंग यांनी जम्मू-काश्मिरात अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करले. शूरवीरांचे गाव अशी या खेड्याची ओळख आजही कायम आहे. (वृत्तसंस्था)
औरंगजेबाच्या सैन्याला पळवणारे गाव जयापूर
By admin | Updated: November 8, 2014 03:08 IST