नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असलेल्या दोन महत्त्वपूर्ण फाईल्स या वर्षअखेरपर्यंत सार्वजनिक करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला आहे. या फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर नेताजींच्या संदर्भातील अनेक रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. तथापि जपानच्या ताब्यात असलेल्या आणखी तीन महत्त्वपूर्ण फाईल्स सार्वजनिक करण्याच्या संदर्भात त्या देशाने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.जपानच्या ताब्यात आलेल्या या सर्व फाईल्स नेताजींच्या जीवनावरील रहस्य उलगडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ‘आपल्या ताब्यातील पाचपैकी दोन फाईल्स या वर्षाच्या अखेरपर्यंत सार्वजनिक करणार असल्याचे जपानने आम्हाला कळविले आहे. अन्य तीन फाईल्सबाबत मात्र कोणतेही आश्वासन जपानतर्फे देण्यात आलेले नाही. परंतु या उर्वरित फाईल्सदेखील सार्वजनिक करण्यात येतील, अशी आम्हाला आशा आहे,’ असे रिजिजू म्हणाले.नेताजींचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी ताईहोकू (ताईपेई) येथे विमान अपघातात झाल्याचे पहिल्या दोन्ही चौकशी आयोगांनी म्हटले होते. परंतु मुखर्जी आयोगाने हा निष्कर्ष फेटाळून लावला होता. नेताजींसोबत नेमके काय घडले हे सांगण्याच्या स्थितीत सरकार नाही, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नेताजींशी संबंधित असलेल्या १५० फाईल्स आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आल्या आहेत आणि त्या सर्व आॅनलाईन उपलब्ध आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>दस्तावेजासाठी भारताचा अनेक देशांशी संपर्कनेताजींशी संबंधित असलेल्या दोन फाईल्स पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि गृहमंत्रालयातून गायब झाल्या आहेत आणि त्या शोधण्याचे काम सुरू आहे. पीएमओमध्ये असलेली फाईल जपानच्या रेन्कोजी टेम्पलमधील नेताजींच्या अस्थी भारतात आणणे आणि लाल किल्ल्यावर त्यांचा पुतळा उभारण्याच्या संदर्भातील असावी, असा विश्वास आहे.गृह मंत्रालयातून गायब झालेली फाईलदेखील त्यांच्या अस्थीशी संबंधित आहे आणि या दोन्ही फाईल्स शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती रिजिजू यांनी यावेळी दिली.नेताजींशी संबंधित काही दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी भारताने अनेक देशांशी संपर्क साधला आहे आणि या सर्व देशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याकडे नेताजींशी संबधित एकही फाईल नाही, असे आॅस्ट्रिया, रशिया व अमेरिकेने कळविले आहे. परंतु आपल्याकडे अशा ६२ फाईल्स असून त्या आपण ब्रिटिश लायब्ररीला भेट दिल्याचे आणि या फाईल्स जनतेसाठी खुल्या असल्याचे ब्रिटनने कळविले आहे, असे रिजिजू म्हणाले.
जपान नेताजींशी संबंधित दोन फाईल्स उघड करणार
By admin | Updated: April 27, 2016 04:48 IST