Jammu To Srinagar Vande Bharat Train: आताच्या घडीला ६६ मार्गांवर वंदे भारत ट्रेनची सेवा अव्याहतपणे सुरू आहे. वंदे भारत ट्रेन देशभरात प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. संपूर्ण देशभरात वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू आहे. अशातच आता जम्मू आणि काश्मीरसाठी विशेष वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही नवीन विशेष वंदे भारत ट्रेन केवळ जम्मू ते श्रीनगर या मार्गावर धावणार आहे.
जम्मूपर्यंत सुरू असलेल्या रेल्वे मार्गाचा विस्तार करून काश्मीर खोऱ्यापर्यंत रेल्वेसेवा सुरू करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा हाती घेतला. परंतु, प्रचंड मोठा आव्हाने पार करत अखेरीस रेल्वेने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची किमया साध्य केली. सुमारे २७२ किमी या मार्गावर एकूण ९०० हून अधिक रेल्वे पूल आहेत. इतर कोणत्याही मार्गावर एवढे बोगदे आणि एवढे पूल क्वचितच पाहायला मिळतील. रियासी आणि संगलदान यांच्या दरम्यानचा चिनाब नदीवरीचा १.३ किलोमीटर लांबीचा पूल हा एक 'इंजिनिअरिंग मार्व्हल' मानला जातो.
जम्मू ते श्रीनगर मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत ट्रेन
जम्मू आणि श्रीनगर या भागांना जोडणारी अत्यंत बहुप्रतिक्षित वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. हा भारतीय रेल्वेसाठी सर्वांत मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. ही अत्याधुनिक वंदे भारत ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) वर चालवली जाणार आहे. वंदे भारतचा हा मार्ग प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देईल. श्री माता वैष्णोदेवी कटरा ते दिल्ली या मार्गावरील यशस्वी रेल्वे सेवेनंतर उत्तर रेल्वेकडून चालवली जाणारी ही तिसरी वंदे भारत ट्रेन असणार आहे.
जम्मू ते श्रीनगर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? तिकीट किती असेल?
जम्मू ते श्रीनगर वंदे भारत ट्रेन मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. या दोन्ही स्थानकांना जोडण्यासाठी ही वंदे भारत ट्रेन २ तास ३० मिनिटांचा वेळ घेणार आहे. जम्मू ते श्रीनगर या मार्गावरील विशेष वंदे भारत ट्रेनच्या तिकिटांबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आला नसला, तरी या ट्रेनचे तिकीट CC साठी १५०० ते १६०० आणि EC साठी २२०० ते २५०० असू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील अतिशय मनमोहक निसर्गाचा पर्यटक, प्रवासी आनंद घेऊ शकणार आहेत.
जम्मू ते श्रीनगरसाठी विशेष वंदे भारत ट्रेन
२५ जानेवारी रोजी कटरा ते श्रीनगर दरम्यान भारतीय बनावटीची विशेष वंदे भारत एक्स्प्रेस ट्रायल रनसाठी धावली. या भागातील हवामान लक्षात घेता, ही ट्रेन काही विशेष सुविधांसह बनवण्यात आली आहे. विशेषत: जेव्हा हिवाळ्यात तापमान शून्यापेक्षा खूप खाली जाते, तेव्हा रेल्वेच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूला त्याचा परिणाम होतो. म्हणून या वंदे भारत ट्रेनच्या अंतर्गत भागात तापमान सुसह्य राहण्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. गोठवणाऱ्या तापमानाचा सामना करण्यासाठी ट्रेनच्या डब्यांमध्ये सिलिकॉन पॅडसह हीटिंग सिस्टम आणि गरम पाण्याची पाइपलाइन देण्यात आली आहे. अशीच सुविधा टॉयलेट्समध्येही करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेनसह या मार्गावर आणखी दोन प्रवासी एक्स्प्रेस धावणार आहेत. या ट्रेनना ताशी ८५ किमी वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या वेग आणि सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.