जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाचा खात्मा करण्याच्या दृष्टीने कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी सुरक्षा दलाने कुलगाममध्ये कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. या शोध मोहीमेदरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या ऑपरेशनमध्ये एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत लष्कराचा एक जेसीओदेखील जखमी झाला. तो त्याच्या टीमसह एका संशयित ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तेथे एकूण २ ते ३ दहशतवादी लपले असल्याचे सांगितले जात असून, शोधमोहिम अजूनही सुरू आहे.
दहशतवादी ठार
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर वन परिसरात सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर पोलिस व लष्कराच्या ९ आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, संयुक्त पथक संशयित ठिकाणाजवळ पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही यास प्रत्युत्तर दिले. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. ही कारवाई अद्यापही सुरूच आहे.
पाकिस्तानी घुसखोराला अटक
एकीकडे कुलगाममध्ये शोधमोहिम राबवली जात असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, आर.एस. पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) एका पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथील रहिवासी सिराज खान नावाचा घुसखोर रविवारी रात्री ९.२० वाजता ऑक्ट्रोय चौकीवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाहिला. घुसखोराने आव्हान दिल्यानंतर जवानांनी गोळीबार केला, त्यानंतर त्याला सीमेवरील कुंपणाजवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून काही पाकिस्तानी चलनी नोटाही जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हद्दीत घुसखोरीच्या प्रयत्नामागील हेतू शोधण्यासाठी त्याची चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.