ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - कारगिल युद्धात १५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला धूळ चारल्यानिमित्त विजयदिन साजरा करताना संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीमध्ये वॉर मेमोरियल व वॉर म्युझियमच्या उभारणीची घोषणा केली. लष्कराच्या अधिका-यांसह दिल्लीमध्ये जागा निश्चित करण्यात येत असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल असे ते म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आत्तापर्यंत शहीद झालेल्या सगळ्या जवानांची माहिती वॉर मेमोरियलमध्ये देण्यात येणार असून या वीरांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तर देशाला वॉर म्युझियमची असणारी गरज अधोरेखीत करताना इंडिया गेट परीसरातील प्रिन्सेस पार्कजवळची जागा जवळपास निश्चित करण्यात आल्याचे जेडलींनी सांगितले. देशासाठी अत्यावश्यक अशा या उपक्रमांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.