अमेरिकन बनावटीचे ब्रिटिशांच्या मालकीचे आणि भारतीय हवाई दलाने ट्रॅक केलेले स्टील्थ लढाऊ विमान F-35B हे दुरुस्त झाले आहे. या महागड्या विमानाचे तंत्रज्ञान लीक होईल म्हणून ब्रिटिशांना एवढी धास्ती होती की त्यांनी ते विमान फुकटचे देऊ केलेल्या एअर इंडियाच्या हँगरमध्ये देखील नेले नव्हते. भारतीय हवाई दलाने हवी नको ती मदत केली होती. परंतू, हे विमान काही केल्या आपल्या पायांवर उडू शकत नव्हते. अखेर पाच आठवड्यांनी या विमानाची दुरुस्ती झाली असून उद्या ते भारत सोडणार आहे.
ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या विमानवाहू नौकेवर तैनात असलेले हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे केरळच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले होते. ब्रिटिशांनी या विमानासाठी भारतीय हवाई दलाकडे परवानगी मागितली होती. त्यांना वाटले होते की आपले विमान हे स्टील्थ म्हणजेच कोणत्याही रडारला पकडता येणार नाही असे आहे. यामुळे भारताला याची कल्पना नसेल. परंतू, भारतीय हवाई दलाने हे विमान आधीच ट्रॅक केलेले होते.
मदत म्हणून भारताने या विमानाला केरळच्या विमानतळावर उतरण्यास परवानगी दिली होती. उतरल्यानंतर इंधनही भरले होते, परंतू या विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम नादुरुस्त झाली होती. तिकडे समुद्रात ३०० नॉटीकल मैलांवर ब्रिटिशांची युद्धनौका विमानाची वाट पाहत उभी होती. भारताने विमान दुरुस्तीची ऑफरही दिली होती, परंतू ब्रिटिशांनी ती नाकारली होती. अखेरीस हे विमान दुरुस्त होत नसल्याने ब्रिटनहून तज्ञांची टीम पाठविण्यात आली होती. जर दुरुस्त झालेच नाही तर विमान डिसमेंटल करून ब्रिटनला मालवाहू विमानात भरून नेण्यात येणार होते.
परंतू, अखेरीस पाच आठवड्यांपासून एकाच जागी उभे असलेले हे लढाऊ विमान पुन्हा हवेत झेपावणार आहे. मंगळवारी या विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली आहे. आता हे विमान पुन्हा आपल्या युद्धनौकेवर परतणार की ब्रिटनकडे जाणार हे स्पष्ट झालेले नाही.