नवी दिल्ली : आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्याच्या अंतिम तारखेमुळे सोमवारी मोठ्या प्रमाणावर करदाते आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर लॉगिन करत होते. पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. काहींनी सोशल मीडियावर लॉगिन करता येत नसल्याच्या तक्रारीही केल्या. अंतिम मुदत वाढवण्याची मागणी केली, पण मुदतवाढ मिळाली नाही.
७ कोटींपेक्षा जास्त आयटीआर दाखल
आयकर विभागाने सांगितले की, १५ सप्टेंबरपर्यंत ७ कोटींपेक्षा जास्त आयकर विवरणपत्रे दाखल झाली आहेत. आता मुदतवाढ मिळणार नाही.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये विभागाने उर्वरित करदात्यांना २०२५-२६ मूल्यांकन वर्षासाठी लवकर विवरणपत्र भरावे, असे आवाहन केले.
गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ७.२८ कोटी विवरणपत्रे दाखल झाली होती.
आयकर वेबसाईट वेगवेगळ्या कारणांनी बंद पडणे, अचानक संथ होणे, टीडीएस डाऊनलोड न होणे, एआयएसमध्ये तफावत अशा असंख्य अडचणी येत होत्या. त्यामुळे सामान्य व्यापारी व पगारदार वर्गात अस्वस्थता आहे.
१५ सप्टेंबरनंतर एक ते पाच हजार हे सक्तीचे विलंब शुल्क आकारले जाणार असून, सर्व डेटा तयार असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनतेला हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
उशिरा भरलेले रिटर्न हे रिवाईज करता येत नाही. तसेच शेअर बाजारात किंवा व्यवसायात लॉस झाला असेल आणि उशिरा रिटर्न भरला असेल तर तो लॉस कॅरी फॉरवर्ड करता येत नाही.