लंडन : अत्यंत कुख्यात दहशतवादी संघटना म्हणून जगभरात वचक निर्माण केलेली इस्लामिक स्टेट (इसिस) अण्वस्त्रे मिळविण्याच्या तयारीत असून, वर्षभरात पाकिस्तानकडून अणुबॉम्ब खरेदी करून अमेरिकेवर आण्विक हल्ल्ला करण्याचा इसिसचा डाव आहे. इसिसच्या ‘दाबिक’ या प्रचार मासिकातील ‘द परफेक्ट स्टॉर्म’ या लेखात हा दावा करण्यात आलेला आहे.हा लेख लिहिला आहे ब्रिटिश वृत्तछायाचित्रकार जॉन कँटली यांनी. दोन वर्षांपासून जॉन कँटली इसिसच्या ताब्यात आहेत. धमकीचा इशारा असो, इसिसच्या इतर कारवाया असोत की, भयावह व्हिडिओफितीमार्फत प्रचार करण्यासाठी इसिस जॉन कँटली यांचा वापर करीत आली आहे. अणुबॉम्ब मिळविण्याच्या दृष्टीने इसिससाठी आता पूर्वीच्या तुलनेत चांगली स्थिती निर्माण झाली आहे. इसिसचे बँकेत अब्जावधी डॉलर असून यातील काही रक्कम पाकिस्तानच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात घालून अण्वस्त्रे मिळविली जातील. तस्करीच्या मार्गाने अण्वस्त्रे उत्तर अमेरिकेत नेण्याची धमकीही या लेखात देण्यात आली आहे.ही अण्वस्त्रे तस्करीच्या मार्गाने अमेरिकेत पोहोचविली जातील, याचीही माहिती या लेखात देण्यात आली आहे. अमेरिकेवर हल्ला करण्याचा मनसुबा इसिसने कधीच दडवलेला नाही. यावेळी इसिसचा मोठा घातपात करण्याचा बेत आहे.नोव्हेंबर २०१२ मध्ये सिरियात जॉन कँटलीला इसिसने ताब्यात घेतले होते. सोबतच अमेरिकी पत्रकार जेम्स फोलेचेही अपहरण करण्यात आले होते. नंतर इसिसने फोलेची निर्दयीपणे हत्या केली.इसिस कोणाकडूनही अण्वस्त्रे खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकते. तथापि, पाकिस्तानकडूनची अण्वस्त्रे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अँथनी ग्लिस यांनी म्हटले आहे. अँथनी हे बकिंघम विद्यापीठातील ‘सेंटर फॉर सिक्युरिटी अँड इंटिलिजेन्स स्टडीज’ या विभागाचे संचालक आहेत. इसिसने पाकिस्तानकडून अण्वस्त्रे हस्तगत केल्यास पाकिस्तानसोबत इसिससाठीही आत्मघाती ठरेल. कारण या व्यवहरात लष्कराचीही भूमिका असेल. इसिस अण्वस्त्रे मिळवू शकेल, असे वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.४अमेरिकेला धडा शिकविणे, हाच आमचा उद्देश आहे. अण्वस्त्रे मिळालीच नाहीत तर, त्याऐवजी अमोनियम नायट्रेट यासारख्या काही टन विध्वंसक स्फोटकांचा वापर केला जाईल. ४इसिस काहीही दडविण्याचा प्रयत्न करीत नाही, असेही या लेखात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या लेखात पुढे असेही म्हटले आहे की, इसिसची व्याप्ती वाढत असून इसिस वणव्यासारखी पसरत असून लवकर पाश्चात्त्य देशांतही आमचा शिरकाव होईल.
इसिस अण्वस्त्रे मिळविण्याच्या तयारीत
By admin | Updated: May 23, 2015 23:51 IST