दमोह - मध्य प्रदेशातील दमोह इथं हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका अंडी विक्रेत्याच्या नावावर दिल्लीत कोट्यवधीची बनावट कंपनी असल्याचं आढळलं आहे. या कंपनीचा टर्नओव्हर ५० कोटींहून अधिक असून त्यावर ६ कोटी जीएसटीची थकबाकी आहे. आयकर विभागाने याबाबत अंडी विक्रेत्याला नोटीस पाठवून बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्राची मागणी केली आहे ज्यामुळे त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.
माहितीनुसार, पथरिया नगर येथे राहणाऱ्या प्रिंस सुमन हे अंडी विक्रीकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र त्यांच्या नावावर दिल्लीत प्रिंस इन्टरप्रायजेस नावाने कंपनी रजिस्टर आहे. ज्यात २०२२ ते २०२४ या काळात ५० कोटींचा व्यवसाय केला. ही कंपनी चामडे, लाकडे, लोखंड यांचा व्यवसाय करते परंतु कंपनीने जीएसटी भरला नाही म्हणून आयकर विभागाने आता प्रिंस सुमन यांना ६ कोटी रूपये थकबाकी भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
मात्र प्रिंस कधीही दिल्लीत गेला नाही, केवळ इंदूर येथे मजुरीचं काम करायला गेला होता. त्याने कुणालाही पॅन कार्ड अथवा आधार कार्ड दिले नाही तरीही दिल्लीत त्याच्या नावावर बनावट कंपनी बनवण्यात आली. आयकर विभागाने जेव्हा या कुटुंबाला नोटीस पाठवली तेव्हा ही बाब उघडकीस आली. प्रिंस सुमन यांचे वडील श्रीधर सुमन एक छोटे किराणा मालाचे दुकान चालवतात. या कुटुंबाने आता सदर प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर येताच कुटुंबाची बाजू मांडणारे वकील अभिलाष खरे यांनी आयकर विभागाला पत्र लिहून माहिती दिली. त्याशिवाय पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत बनावट कंपनीमागील खरे गुन्हेगार शोधण्याची मागणी केली आहे.