नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) ने २२ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या दोन दिवसांच्या सोहळ्यात भारतीय अंतराळ स्टेशन(BAS) चा मॉडेल पहिल्यांदाच जगासमोर उघड केला आहे. दिल्लीच्या भारत मंडपम येथे कार्यक्रम झाला. २०२८ पर्यंत BAS-01 म्हणजे पहिले मॉड्यूल अंतराळात पाठवले जाईल. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन तयार करण्याचं टार्गेट भारताने ठेवले आहे. त्यानंतर भारत त्या निवडक देशांच्या यादीत समाविष्ट होईल ज्यांचे स्वत:चे अंतराळ स्टेशन चालते.
भारतीय अंतराळ स्टेशन काय आहे?
भारतीय अंतराळ स्टेशन (BAS) भारताचं स्वदेशी अंतराळ स्टेशन असेल, जे पृथ्वीपासून ४५० किमी अंतरावर लो अर्थ ऑर्बिटवर बसवले जाईल. आतापर्यंत जगात केवळ २ अंतराळ स्टेशन आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन हे अमेरिका, रशिया, यूरोप, जपान, कॅनडा यांच्या अंतराळ स्टेशन मिळून संचलित करतात तर तियांगोंग अंतराळ स्टेशन हे चीनचे आहे. भारताचे अंतराळ स्टेशन हे त्यापेक्षा वेगळे असेल कारण ते पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केले जाईल. २०३५ पर्यंत भारताच्या BAS चे ५ मॉड्यूल अंतराळात बसवले जातील. जे एक पूर्ण अंतराळ प्रयोगशाळा असतील हे ISRO चे लक्ष्य आहे.
BAS-01 मॉड्यूल हे पहिले पाऊल
BAS 01 भारतीय अंतराळ स्टेशनचं पहिलं मॉड्यूल असेल, ज्याला २०२८ मध्ये लॉन्च करण्यात येईल. या मॉड्यूलचे वजन १० टन इतके आहे. ते आकाराने ३.८ मीटर रूंद आणि ८ मीटर लांबीचे आहे. पृथ्वीपासून ४५० किमी अंतरावर ते स्टेशन असेल. भारताने त्यात डॉकिंग सिस्टिम, भारत बर्थिंग मॅकेनिज्म आणि स्वयंचलित हॅच सिस्टम बसवली आहे. यात अंतराळवीरांना श्वास घेण्यायोग्य हवा, पाणी आणि तापमान प्रदान करेल. वैज्ञानिकांना छायाचित्रे काढण्यासाठी आणि अंतराळवीरांच्या मनोरंजनासाठी खिडक्या असतील. रेडिएशन, उष्णता आणि माइक्रो मेटियोरॉइट ऑर्बिटल डेब्रिसपासून बचाव करण्यासाठी उपकरणे आहेत. आधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टम जी सहजपणे अपग्रेड होईल.
अंतराळ पर्यटनाला चालना मिळेल
हे अंतराळ स्थानक अंतराळ पर्यटनाला चालना देईल. या कक्षीय प्रयोगशाळेच्या संसाधनांचा फायदा घेऊन भारत व्यावसायिक अंतराळ क्षेत्रात प्रवेश करेल. BAS चालू आंतरराष्ट्रीय सहकार्यात योगदान देईल आणि वैज्ञानिक संशोधनाचे केंद्र म्हणून काम करेल. ते तरुण पिढीला अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानात करिअर करण्यासाठी प्रेरित करेल. भारत मंडपम येथे झालेल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या समारंभात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये ३.८ मीटर बाय ८ मीटरचा विशाल बीएएस-०१ मॉडेल आकर्षणाचे केंद्र होता.
भारताचे अंतराळ भविष्य
BAS हा भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमाचा एक भाग आहे. याशिवाय, भारताच्या इतर अनेक योजना आहेत.
१. गगनयान मोहीम: भारत २०२६ पर्यंत आपले पहिले मानवयुक्त अभियान अवकाशात पाठवेल.
२. चांद्रयान-४: २०२८ पर्यंत चंद्रावरून नमुने आणण्याचे अभियान.
३. शुक्रायान: २०२५-२६ मध्ये शुक्राचा अभ्यास करण्याचे अभियान.
४. अंतराळ पर्यटन: BAS द्वारे भारत २०३० पर्यंत १३ अब्ज डॉलर्स किमतीच्या अंतराळ पर्यटन बाजारपेठेत प्रवेश करेल.
BAS चे पहिले मॉड्यूल LVM-३ रॉकेटद्वारे लाँच केले जाईल, जे भारताचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. यानंतर आणखी चार मॉड्यूल जोडले जातील जे २०३५ पर्यंत संपूर्ण स्टेशन तयार करतील. भारतीय अंतराळ स्टेशन (BAS) बनवण्यासाठी २० हजार कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. जटिल तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करणे, अंतराळात स्पेस डेब्रिस आणि रेडिएशन हे मोठे आव्हान आहे. या भारतीय अंतराळ स्टेशनमुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल.