बंगळुरू : अंतराळात डॉकिंग प्रयोग करण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या दोन उपग्रहांना चाचणीदरम्यान तीन मीटर अंतरावर आणण्यात आले आणि नंतर सुरक्षितपणे परत नेण्यात आले, अशी माहिती इस्रोने रविवारी दिली.
डेटाचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही स्पेस एजन्सीने म्हटले आहे. इस्रोने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रथम १५ मीटर आणि नंतर तीन मीटरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंतराळ यानाला पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात येत आहे.
इस्रोने ३० डिसेंबर रोजी स्पेस डॉकिंग एक्सपेरीमेंट (स्पेडेक्स) मिशन यशस्वीरीत्या अवकाशात पाठवले. स्पेसक्राफ्ट ए आणि स्पेसक्राफ्ट बी हे दोन उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून पीएसएलव्ही सी ६० रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले.
भारत चौथा देशसुमारे १५ मिनिटांनंतर, २२०-२२० किलो वजनाचे हे छोटे अंतराळ यान नियोजनाप्रमोण ४७६ किमीच्या वर्तुळाकार कक्षेत दाखल झाले. यामुळे भारतीय अंतराळ स्थानक आणि चंद्रावर उतरणारे अंतराळवीर यांसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जटील तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारा भारत चौथा देश बनेल.डॉकिंग ही एक अशी प्रक्रिया आहे की, ज्यामध्ये दोन वेगवान अंतराळयाने एकाच कक्षेत चालवली जातात आणि नंतर ती एकमेकांच्या जवळ आणली जातात. एकाच वेळी प्रक्षेपित करता येणे शक्य नसणाऱ्या अंतराळयानाचे भाग आणि उपकरणांचे काही मोहिमांसाठी डॉकिंग आवश्यक असते.