श्रीनगर : भारतातील तरुणांची जिहादी कृत्यांसाठी भरती करून घेणाऱ्या इस्लामिक स्टेट तथा इसिसने सरहद्द ओलांडून भारतात प्रवेश केल्याची धोकादायक चाहूल काश्मीरच्या खोऱ्यात लागली आहे. सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वाखालील कट्टरवादी हुर्रियत कॉन्फरन्सने पुकारलेल्या निदर्शनादरम्यान शुक्रवारी श्रीनगर आणि कुपवाडा येथे अतिरेकी संघटना इसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकले. काश्मीर खोऱ्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका फुटीरवादी कार्यकर्त्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी श्रीनगर येथील जामिया मशिदीपासून नौहाटा चौकापर्यंत मार्च काढण्यात आला. त्यात इसिस झेंड्याशी मिळतेजुळते काळे बॅनर हाती घेतलेले आणि तोंड झाकलेले काही युवक सहभागी झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधी काही युवकांनी पाकिस्तानी झेंडेही फडकविले. यानंतर पोलिसांनी या सर्वांना येथून पळवून लावले. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा या संवेदनशील सीमावर्ती भागातही असे झेंडे फडकविण्यात आल्याचे वृत्त आहे.महिन्याभरापूर्वी पाकिस्तानातील कराची शहरात इसिसने शिया इस्माईली मुस्लिमांच्या बसवर हल्ला करून ४७ जणांना ठार केले होते. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी कराचीत घडविलेल्या त्या हत्याकांडाने इसिस भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असल्याचा इशारा दिला होता.
काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे!
By admin | Updated: June 13, 2015 03:59 IST