ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या राजधानी दिल्लीतील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे असून भारतीय जनता पक्षाला दिल्ली सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दिल्लीत सरकार बनवण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. 'भाजपला दिल्लीत सत्ता स्थापन करण्यास संधी देण्याबद्दल' राष्ट्रपतींकडे परवानगी मागण्यात आली आहे.
उपराज्यपालांनी गुरूवारी राष्ट्रपतींकडे यासंदर्भात अहवाला पाठवला असून 'भाजपाला विधानसभेत एकदा बहुमत सिद्ध करण्याची परवानगी द्यायला हवी' असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 'हा अहवाल आपल्याला मिळाला असून तो गृहमंत्रालयाकडे पाठवून याविषयी त्यांचे मत मागितले आहे,' असे राष्ट्रपती भवनातील एका अधिका-याने सांगितले.
दिल्ली विधानसभेसाठी शिरोमणी अकाली दलासह भाजप सध्या मोठा पक्ष आहे. ६९ आमदारांच्या दिल्ली विधानसभेत बहुमत सिद्ध करायला ३५ आमदारांची गरज आहे.
फेब्रुवारी महिन्यात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र 'आम आदमी पक्षाने' विधानसभा भंग करून निवडणुकीची मागणी केली होती.
दरम्यान राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेल्या पत्रावर आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली असून राज्यपाल आपली खुर्ची वाचवण्यासाठी हा प्रकार करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.