ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - गुजरातमधील राजकोट येथे भाजपा कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले असतानाच मोदींना मात्र कार्यकर्त्यांचा हा प्रताप फारसा रुचलेला नाही. 'तुमच्याकडे पैसे व वेळ असेल तर अशी मंदिरं बांधण्याऐवजी त्याचा वापर स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावा' अशा शब्दात मोदींनी त्यांच्या समर्थकांचे कान टोचले आहेत.
राजकोटमध्ये अतिउत्साही भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले असून या मंदिराचे १५ फेब्रुवारीरोजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहन कुंदारिया यांच्या हस्ते उद्घाटनही होणार आहे. गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे या मंदिरावर नाराजी व्यक्त केली. 'माझे मंदिर उभारल्याचे वृत्त बघून मी दु:खी झालो आहे. आपल्या संस्कृतीने अशा प्रकारचे मंदिर बांधण्यास कधीच शिकवलेले नाही. कार्यकर्त्यांनी अशी मंदिरं बांधू नये' असे आवाहन मोदींनी केले आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
राजकोट जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी मोदींचे मंदिर बांधले आहे. या मंदिरात मोदींची मुर्ती बसवण्यात आली असून मंदिराच्या कळसावर कमळ लावण्यात आले आहे. रिसा येथील कारागिरांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे. या मंदिरात सध्या दररोज १०० भाविक दर्शनासाठी येत असून मोदींची मंदिरे अन्य राज्यातही बांधावी असे या अतिउत्साही भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.