चेन्नई : अद्रमुकच्या काही मान्यवर नेत्यांनी अद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची साथ सोडून हंगामी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या तंबूत प्रवेश केल्यामुळे तामिळनाडूतील राजकीय लढाई शनिवारी आणखी टोकदार झाली. पनीरसेल्वम गटात सामील झालेल्यांत एक मंत्री, दोन खासदार आणि एक पक्ष प्रवक्ता यांचा समावेश आहे. त्या रिसॉर्टमध्ये जाऊन आज पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी अद्रमुक आमदारांची चौकशी केली. रिसार्टमध्ये बुधवारपासून अद्रमुकचे १२0 आमदार वास्तव्यास आहेत. अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक तमिळसेल्वम आणि महसुली अधिकारी रामचंद्रन यांनी रिसॉर्टला भेट देऊन आमदारांकडे चौकशी केली. त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले आहे का, याची विचारणा प्रामुख्याने करण्यात आली. शशिकला यांनीही रिसॉर्टमध्ये आमदारांची बैठक घेतली. शशिकला यांनी नेमलेले अध्यक्षीय मंडळाचे नवे चेअरमन के. ए. सेनगोट्टय्यन यांनी बैठकीनंतर सांगितले की, शशिकला यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याची शपथ या वेळी आमदारांनी घेतली. राज्यपालांची मागितली भेटशशिकला यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भेटण्यासाठी राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांच्याकडे वेळ मागितली आहे. राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात शशिकला यांनी म्हटले की, आपल्या समर्थक आमदारांची यादी तसेच विधिमंडळ पक्षांचा नेता म्हणून झालेल्या निवडीचा ठराव आपण ९ फेब्रुवारी रोजीच राज्यपालांना सादर केला आहे. आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर करण्यासाठी आता आपणास वेळ देण्यात यावा. आवश्यकतेनुसार सर्व आमदारही त्या वेळी उपस्थित राहतील.मुख्यमंत्र्यांच्या गटात शिक्षणमंत्र्यांचा प्रवेशशालेय शिक्षणमंत्री के. पंडियाराजन यांनी सकाळी शशिकला यांची साथ सोडून हंगामी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या तंबूत प्रवेश केला आहे. माजी मंत्री के. पी. मुनासामी आणि राज्यसभा सदस्य व्ही. मैत्रेयन त्यांच्यासोबत होते. अम्मांचा वारसा पनीरसेल्वम हेच चांगल्या प्रकारे चालवतील असे मला वाटते, असे पंडियाराजन यांनी सांगितले. पनीरसेल्वम यांच्या गटात चार खासदार व एक आमदार सहभागी झाले आहेत. नमक्कल आणि कृष्णागिरीचे खासदार अनुक्रमे पी. आर. सुंदरम आणि के. अशोक कुमार हे पनीरसेल्वम यांना येऊन मिळाले आहेत. वेदनिलयम हे स्मारकजयललिता यांचे पोएस गार्डन येथील वेदनिलयम निवासस्थान स्मारकात रूपांतरित करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात पनीरसेल्वम यांनी केली आहे. आज सकाळी त्यांनी ही घोषणा केली.एमजीआर यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि पक्षाचे प्रवक्ते सी. पोन्नयन यांनीही पनीरसेल्वम गटात उडी घेतली. माजी मंत्री एम. एम. राजेंद्र प्रसाद हेही पनीरसेल्वम यांना येऊन मिळाले. पनीरसेल्वम हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य आहेत, असे पोन्नयन यांनी सांगितले.
अद्रमुक आमदारांची चौकशी सुरू!
By admin | Updated: February 12, 2017 05:40 IST