Inflation : उच्च पगाराचीनोकरी आणि आधुनिक लाइफस्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये मोठी कमाई असूनही बचत करणे किती कठीण जाते, याचे ताजे उदाहरण अलीकडे समोर आले आहे. दरमहा सुमारे १.५ लाख रुपये पगार असतानाही एका तरुणाच्या हातात महिन्याकाठी फक्त १५ ते २० हजार रुपयेच बचत उरत असल्याचा अनुभव सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाढते घरभाडे, रोजचे खर्च यामुळे मोठ्या शहरांमध्ये कमाईच्या तुलनेत बचत करणे कठीण होत असल्याचे यातून दिसून येते.
सोशल मीडियावर अनुभव व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका यूजरने आपल्या चुलत भावाचा अनुभव शेअर केला. त्यानुसार, कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा चुलत भाऊ बंगळुरूमधील एका टेक कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करू लागला. त्याला दरमहा सुमारे १.५ लाख रुपये पगार मिळत असल्याने कुटुंबीय आणि मित्रांना त्याचे आयुष्य खूप आरामदायक असेल, अशी अपेक्षा होती. मोठी टेक कंपनी, मोठे शहर आणि मोठ्या पगारामुळे त्याने मोठी मजल मारल्याची भावना सर्वांमध्ये होती.
रोजच्या खर्चांनी बदलली परिस्थिती
तो पुढे म्हणतो, काही महिन्यांतच मोठ्या शहरातील खर्चांची खरी जाणीव भावाला झाली. ऑफिसजवळील एका छोट्या अपार्टमेंटचे दरमहा सुमारे ३६ हजार रुपये भाडे द्यावे लागत होते. याशिवाय खाणे-पिणे व किराणासाठी दरमहा सुमारे १३ ते १५ हजार रुपये, कॅब व ऑटो प्रवास सुमारे ६ ते ८ हजार रुपये आणि ऑनलाइन फूड ऑर्डर, कॉफी आणि वीकेंड आउटिंगसाठी सुमारे १० ते १२ हजार रुपये खर्च यायचा. अशा प्रकारे विविध खर्चांमुळे पगाराचा मोठा भाग खर्च होत होता. विशेषतः Swiggy सारख्या फूड डिलिव्हरी अॅप्स वापरण्यामुळे खर्च आणखी वाढल्याचेही सांगण्यात आले.
छोट्या खर्चांमुळे बचत कमी
याशिवाय काही असे लपलेले खर्चही होते, ज्याकडे सहसा लक्ष जात नाही. उदाहरणार्थ ऑनलाइन सब्सक्रिप्शन, वैद्यकीय खर्च, अचानक येणारी बिले आणि घरी पैसे पाठवणे...या सर्व खर्चांनंतर महिन्याच्या शेवटी फक्त १५ ते २० हजार रुपयेच बचत शिल्लक राहत होती.
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपली मते व्यक्त केली. काही यूजर्सनी सांगितले की, ऑफिसपासून थोडे दूर आणि मेट्रो लाईनजवळ घर घेतल्यास भाडे कमी होऊ शकते. तर अनेकांनी असेही मत व्यक्त केले की, मोठ्या शहरांमध्ये पगार जास्त असला तरी महागाई आणि लाइफस्टाइल खर्चामुळे बचत कमी होते, ही वास्तवता आहे.
Web Summary : Despite a ₹1.5 lakh salary in Bengaluru, a software developer saves only ₹15,000 monthly. High rent, food, and lifestyle expenses significantly reduce savings, highlighting the financial challenges in big cities.
Web Summary : बेंगलुरु में ₹1.5 लाख वेतन के बावजूद, एक सॉफ्टवेयर डेवलपर केवल ₹15,000 मासिक बचाता है। उच्च किराया, भोजन और जीवनशैली व्यय बचत को काफी कम करते हैं, जो बड़े शहरों में वित्तीय चुनौतियों को उजागर करते हैं।