इंदोर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जर ७५ टक्के हजेरी लावली तर त्यांना स्मार्टफोन देण्याची घोषणा राज्यातील भाजपने २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत केली होती. या घोषणेची पूर्तता म्हणून अशा ५५ विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले आहे. उच्च शिक्षण मंत्री जयभान सिंग पवईया यांनी इंदोरमधील ११ शासकीय महाविद्यालयातील २०१४-१५ च्या बॅचच्या ५५ विद्यार्थ्यांना मंगळवारी या स्मार्टफोनचे वाटप केले. भाजपने आपल्या घोषणापत्रात अशा विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देण्याचा शब्द दिला होता. सरकारने सर्व महाविद्यालयाकडून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी मागविली होती. दरम्यान, स्मार्टफोन वाटपाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिक्षण मंत्री जयभान सिंग पवईया म्हणाले की, जागतिकीकरणाच्या या लाटेत स्मार्टफोनची गरज वाढली आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द आता मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे. पंतप्रधान मोदी व माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मही छोट्याशा गावातच झाला. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. आगामी वर्षात उच्च शिक्षणात मोठे फेरबदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हजेरीबद्दल इंदोरच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन
By admin | Updated: September 1, 2016 04:16 IST