भारतीय विमान कंपनी इंडिगो अदानी समूहाच्या मालकीच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण सुरू करणारी पहिली विमान कंपनी ठरणार आहे, असे वृत्त एएनआयने बुधवारी दिले.
एनएमआयएवरून उड्डाण सुरू करणारी पहिली एअरलाइन भागीदार म्हणून इंडिगोची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ट्रान्सफर हब म्हणून एनएमआयएचे स्थान निश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे,” असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या दिवसापासून १५ हून अधिक शहरांमध्ये दररोज १८ उड्डाणे करण्याचे इंडिगोचे उद्दिष्ट आहे. नोव्हेंबर २०२५ च्या सुरुवातीपर्यंत नवी मुंबई विमानतळावरून दररोज ७९ उड्डाण घेतील आणि यापैकी १४ आंतरराष्ट्रीय असतील, असे अश्वासन इंडिगोने दिले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३,७०० मीटर लांबीचा धावपट्टी असेल. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ टन मालवाहतूक केली जाईल, अशी माहिती इंडिगोच्या एका अधिकाऱ्याने दिली. २ हजार ८६६ एकरच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे २०२५ च्या पहिल्या सहामाहीत उड्डाणांसाठी उद्घाटन होण्याची अपेक्षा आहे.
अदानी ग्रुपकडे सध्या मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळ प्रकल्प आहेत. नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झाल्यानंतर ते देखील यादीत समाविष्ट केले जाईल. दरम्यान, २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची पहिली चाचणी पूर्ण केली. हे विमानतळ डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होण्यास सज्ज होते. परंतु, पायाभूत सुविधांच्या विलंबामुळे त्याला उशीर झाला.