देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशात लसीकरण हा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. परंतु सध्या पुढील काही महिने लसींची कमतरता भासू शकते असं मत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं. "१० कोटी लसी उत्पादन करण्याची क्षमता जुलै महिन्यापूर्वी वाढू शकणार नाही," असंही त्यांनी नमूद केलं. सध्या देशात महिन्याला ६ ते ७ कोटी लसींचं उत्पादन करण्यात येत आहे. यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं अदर पूनावाला म्हणाले. फायनॅन्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. यामुळे आता लसींची कमतरता जुलै महिन्यापर्यंत भासणार असल्याचं म्हटलं जात आहे. "आमच्याकडे कोणतीही ऑर्डर नव्हती. आम्हाला वर्षाला १०० कोटींपेक्षा अधिक डोस उत्पादन करण्याची गरज भासेल असं वाटलं नव्हतं. तसंच जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येईल याचा अंदाजही अधिकाऱ्यांना नव्हता. प्रत्येकाला ही महासाथ संपुष्टात आल्याचंच वाटत होतं," असं पूनावाला म्हणाले. बदनाम करण्याचा प्रयत्नआपल्या कंपनीचा बचाव करताना पूनावाला यांनी लसीच्या कमतरतेबाबत राजकीय लोकांकडून आणि टीकाकारांकडून सीरम इन्स्टिट्यूटला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे यापूर्वी कोणताही आदेश नव्हता. तसंच वर्षाला १०० कोटी लसींच्या डोसचं उत्पादन करावं लागेल असंही वाटलं नसल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. केंद्र सरकारनं सुरूवातीला सीरमकडून २.१ कोटी डोस मागवले होते. मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर सरकारनं ११ कोटी डोसची ऑर्डर दिली. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. दरम्यान, सरकारनं आपल्या उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करण्याची परवानगीही कंपन्यांना दिली आहे.
लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, "पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 11:18 IST
Coronavirus Vaccine : यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं पूनावाला यांनी केलं नमूद
लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता
ठळक मुद्देयापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं पूनावाला यांनी केलं नमूदसध्या देशात ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सरकारनं दिली परवानगी