भारतीय नौदलाची हवाई संरक्षण क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रोजेक्ट 'पी ०४४' अंतर्गत, डीआरडीओने अतिशय कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली (Very Short Range Air Defence System - V-SHORADS) नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी, 'स्टॅबिलाइज्ड लाँच मेकॅनिझम सिस्टीम' (SLMS) सागरी चाचण्यांसाठी एका जहाजावर बसवण्यात येणार आहे.
'V-SHORADS' काय आहे खास?
'V-SHORADS' ही एक पूर्णपणे स्वदेशी, अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही सिस्टम अत्यंत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोन, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांना सहजपणे नष्ट करण्यास सक्षम आहे. विशेषतः युद्धनौकांना आधुनिक हवाई धोक्यांपासून वाचवण्यासाठी हे एअर डिफेन्स सिस्टम विकसित करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, V-SHORADS मुळे भारतीय नौदलाची ताकद, विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वाढेल, जिथे भू-राजकीय तणाव वेगाने वाढत आहे.
SLMSची खासियत काय?
SLMSची सर्वात मोठी खासियत म्हणजे जहाज भर समुद्रात असतानाही ही सिस्टम अचूक लक्ष्य साधू शकेल. समुद्रातील लाटा आणि वाऱ्यामुळे जहाज जरी हेलकावत असले तरी, हे लाँचर त्या हालचालींवर नियंत्रण ठेवून मिसाईलला योग्य दिशेने डागण्यास मदत करेल. यामुळे, नौदलाला शत्रूंना प्रत्युत्तर देणे अधिक सोपे होईल.
संरक्षण मंत्रालयाला दिली यादी!
नुकतेच, डीआरडीओने लष्कर, वायुसेना आणि नौदलासाठी २८ स्वदेशी शस्त्र प्रणालींची यादी संरक्षण मंत्रालयाला तातडीच्या खरेदीसाठी दिली आहे. यामध्ये V-SHORADS चाही समावेश आहे.
नौदलाला मिळेल 'मल्टिलेअर एअर डिफेन्स' सुरक्षासंरक्षण सूत्रांनुसार, नौदलाच्या युद्धनौकेवर SLMSच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, हे सिस्टम नौदलाच्या ताफ्यातील इतर युद्धनौकांवरही तैनात केले जाऊ शकते. यामुळे भारतीय नौदलाच्या 'मल्टिलेअर एअर डिफेन्स सिस्टीम'ला अधिक बळकटी मिळेल. सध्या नौदलाकडे 'बराक-८' (Barak-8) आणि आकाश (Akash) मिसाईल सारख्या प्रणाली आधीच तैनात आहेत.
शत्रूंना देणार सडेतोड उत्तर!'V-SHORADS'च्या कॉम्पॅक्ट डिझाइन आणि लवचिकतेमुळे, ते विनाशक (destroyers), फ्रिगेट (frigates), कॉर्व्हेट (corvettes) आणि ऑफशोर पेट्रोल वेसल (offshore patrol vessels) सारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर बसवले जाऊ शकते. यामुळे नौदलाला शत्रूंचे ड्रोन, हेलिकॉप्टर आणि अँटी-शिप मिसाईल यांसारख्या धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नवी ताकद मिळेल.
जर सागरी चाचण्या यशस्वी झाल्या, तर येत्या काळात V-SHORADS भारतीय नौदलाच्या ताफ्याचा एक महत्त्वाचा भाग बनेल आणि देशाच्या सागरी सीमांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करेल.