ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १४ - सौरऊर्जेवर चालणा-या छोटयाशा टकटक रिक्षामधून ६,२०० मैलांचा प्रवास करुन भारतीय वंशाचा इंजिनीयर सोमवारी ब्रिटनमध्ये दाखल झाला. नवीन राबेली असे या इंजिनीयरचे नाव असून, ३५ वर्षाच्या नवीनने भारतातून प्रवासाला सुरुवात केली होती.
टकटक रिक्षाने ६२०० मैलाचा जमिनीवरुन प्रवास करुन राबेली ब्रिटनमध्ये दाखल झाला. नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिराने तो इंग्लंडमध्ये पोहोचला. फ्रान्समध्ये पासपोर्ट आणि पैशांचे पाकिट चोरीला गेल्याने त्याला विलंब लागला. पॅरिसपर्यंत आपला प्रवास उत्तम झाला पण त्यानंतर सामनाची चोरी झाल्याने थोडा त्रास झाला असे नवीनने सांगितले.
संपूर्ण प्रवासात लोकांनी मला भरपूर सहकार्य केले. अनेक देशांमध्ये टकटक रिक्षाची कल्पना आवडली. खासकरुन इराणमध्ये लोक टकटकच्या प्रेमात पडले असे त्याने सांगितले. राबेली जन्माने भारतीय असला तरी, तो ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसजवळ तो आपला प्रवास संपवणार आहे.
वीजेवर, सौरऊर्जेवर चालणा-या वाहनांचा अधिक वापर व्हावा, त्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी राबेलीने टकटक रिक्षाने प्रवास केला. नवीनने त्याच्या रिक्षामध्येच सर्व व्यवस्था केली होती. यात एक बिछाना, कपाट आणि सौरऊर्जेवर चालणारा कुकर होता. मी आणि माझा मित्र एकदा भारतात ट्राफीकमध्ये अडकलो होतो. त्यावेळचा तो गोंगाट, रिक्षातून होणारे प्रदूषण पाहून मला सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा बनवून त्यातून प्रवास करण्याची कल्पना सुचली असे त्याने सांगितले.