वाॅशिंग्टन : भारतात डेल्टा विषाणूच्या संख्येइतकेच ‘ओमायक्रॉन’बाधितांचे प्रमाण असण्याची शक्यता आहे. कदाचित ही आकडेवारी वाढूही शकते. चालू महिन्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसून येईल, असे इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) या संस्थेने म्हटले आहे.
या संस्थेचे संचालक डॉ. ख्रिस्तोफर मुरे यांनी म्हटले आहे की, लसीमुळे कोरोना संसर्गाची तीव्रता वाढणार नाही. या संसर्गाची लक्षणे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचीच राहतील. ‘ओमायक्रॉन’च्या प्रसाराचा वेग मोठा असून, दोन महिन्यांत रुग्णांची संख्या प्रचंड वाढणार आहे. (वृत्तसंस्था)
जेवढा प्रसार जास्त, तेवढे विषाणूचे नवे प्रकार‘ओमायक्रॉन’ विषाणूचा जितक्या वेगाने प्रसार होईल, त्यातून कोरोना विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ‘ओमायक्राॅन’ हा डेल्टा विषाणूपेक्षा कमी घातक आहे. मात्र, त्यामुळे बेसावध राहून योग्य काळजी न घेतल्यास कोरोना संसर्गाला आणखी नवे वळण लागू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनाबिहारमधील उपमुख्यमंत्री रेणुदेवी, तारकिशोर प्रसाद व आणखी दोन मंत्री अशोक चौधरी, सुनीलकुमार यांना कोरोनाची बाधा झाली असून, हे चौघे जण विलगीकरणात आहेत. या राज्याच्या सर्व मंत्र्यांनी दक्षता म्हणून आरटीपीसीआर चाचणी करून घेतली आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या पक्षाचे अध्यक्ष सुखदेवसिंग धिंडसा यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
हाँगकाँगमध्ये क्रूझवर अडकले प्रवासीहाँगकाँग येथे एका क्रूझवरील काही हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रवासी त्या क्रूझवरच अडकून पडले आहेत. त्यातील नऊ प्रवासी ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने खळबळ माजली आहे. हाँगकाँग येथील काई ताक येथे ही क्रूझ सध्या उभी कऱण्यात आली आहे. सध्या लोकांनी कोणत्याही क्रूझमधून प्रवास करणे टाळावे असे आवाहन हाँगकाँग सरकारने केले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाने हाँगकाँगमध्ये अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.