सुरेश एस डुग्गर
जम्मू : पहलगाम नरसंहारानंतर भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून ‘हल्ला’ करण्याची तयारी करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. उरी हल्ल्यानंतर केलेली कारवाईही पहिली कारवाई नव्हती. कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्याला अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यास भाग पाडले गेले; परंतु हे इतके गुप्तपणे पार पडले की, आजही भारतीय सैन्य अशा कारवायांवर मौन बाळगत आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारलेल्या सर्जिकल स्ट्राइकची नोंद झाली होती; पण एलओसीवर भारतीय लष्कराने केलेली ही कारवाईदेखील पहिली नव्हती. याआधीही, कारगिल युद्धानंतर, जेव्हा जेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैनिकांना मारले किंवा त्यांनी पाठवलेल्या दहशतवाद्यांनी देशात लोकांना मारले, त्या त्यावेळी भारतीय सैन्याने अनेकदा नियंत्रण रेषा ओलांडली होती. उरी घटनेतील एकमेव विशेष गोष्ट म्हणजे, भारतीय सैन्याने पहिल्यांदाच नियंत्रण रेषा ओलांडल्याचे मान्य केले.
त्यांचेही तितकेच नुकसान
पाक सैन्याने दहशतवाद्यांची मदत घेत भारतीय सैनिकांना नुकसान पोहोचवले. त्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई झाली, तेव्हा भारतीय सैन्यानेही नियंत्रण रेषा ओलांडली. पाक सैन्याचेही नुकसान केले
पाकने नेमक्या काय खोड्या केल्या होत्या?
१४ मे २००२ रोजी कालू चक येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहारात ३४ लोक मारले गेले.
मृतांमध्ये सैनिकांच्या महिला आणि मुलांचा समावेश होता. २०१३ मध्ये दोन घटना घडल्या. एक ६ ऑगस्ट रोजी आणि दुसरी ८ जानेवारी रोजी.
एका घटनेत पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांना मारले आणि दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानी सैनिकांनी हेमराज यांचे शिर वेगळे करत सोबत नेले. यामुळे भारतीय सैन्यात संताप उसळला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला जोरदार उत्तर दिले होते.
पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान केव्हा झाले?
सूत्रांच्या माहितीनुसार, कालू चक नरसंहार, नाईक हेमराज सिंग यांचा शिरच्छेद करणे आणि ऑगस्ट २०१३ मध्ये सीमा चौकी ताब्यात घेताना पाकिस्तानी सैन्याने पाच सैनिकांची हत्या केल्याच्या घटनांमध्ये भारतीय सैन्याने पाकचे सर्वाधिक नुकसान केले.
...म्हणून भारतीय सैन्याला मिळाली नवी ओळख
भारताने हल्ल्यांचा बदला घेतला. मात्र तरीही असे मानले जात नव्हते की प्रत्युत्तर म्हणून नियंत्रण रेषा ओलांडली गेली; पण उरीची घटना ही अशी पहिलीच घटना होती जिथे भारतीय सैन्याने अधिकृतपणे मान्य केले की, सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्य आणि दहतशवाद्यांना यमसदनी धाडले होते.
यामुळे भारतीय सैन्याची ओळख ‘आक्रमक सैन्य’ म्हणून झाली.