नवी दिल्ली : भारताच्या मंगळ मोहिमेच्या यशावर टीकात्मक कार्टून प्रसिद्ध करणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सने भारताची माफी मागितली आहे. या कार्टूनमध्ये पगडी घातलेला एक माणूस बरोबर गाय घेऊन आलेला असून, तो इलाईट स्पेस क्लबचे दार ठोठावत आहे, असे दाखविण्यात आले आहे. हे कार्टून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा मारा होऊ लागला. न्यूयॉर्क टाइम्सचे हे कृत्य वंश व वर्णभेदी असल्याची टीका जगातील विचारवंतांनी केली. प्रसारमाध्यमांनीही टीकेचा सूर धरला. तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचा हा अपमान असल्याचे बोलले जाऊ लागले. भारताच्या अवकाशातील यशावर टीका करण्यासाठी पाश्चिमात्य जग असांस्कृतिक मार्गाचा वापर करत असल्याचे मत व्यक्त केले गेले. न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेल्या या व्यंगचित्रावर वाचकांनीही नाराजी व्यक्त केली. अखेर सोमवारी सकाळी न्यूयॉर्क टाइम्सच्या फेसबुक पेजवर पहिल्या पानावर हा माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला. हेंग किम सोंग याने हे कार्टून काढले होते. अवकाश संशोधन ही आता फक्त श्रीमंत व विकसित देशांची मक्तेदारी राहिलेली नाही, असे त्यांना दाखवायचे होते, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. हेंग किम सोंग हे सिंगापूरचे रहिवासी असून, त्यांची व्यंगचित्रे नेहमीच प्रक्षोभक असतात. या व्यंगचित्रामुळे दुखावलेल्या व्यक्तींची आम्ही क्षमा मागतो. आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्याचे स्वागतच आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीय पानाचे संपादक अँड्र्यू रोसेंथल यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अमेरिकेतील वृत्तपत्राने मागितली भारताची माफी
By admin | Updated: October 6, 2014 23:46 IST