नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला घटनाबाह्य ठरविले असले तयी तो निर्णय आम्हाला मान्य नाही, असे जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने म्हटले आहे. या संघटनेचे सरचिटणीस मौलाना महमूद मदानी यांनी देशभरात तलाक प्रथा सुरूच राहील आणि तो वैध मानला जाईल, असा दावाही त्यांनी केला. 'तुम्हाला शिक्षा करायची असेल, तर बिनधास्त करा, पण तलाक प्रथेचे पालन केले जाईलच', असा इशाराच मौलाना महमूद मदानी यांनी दिला.न्यायालयाचा निर्णय म्हणजे आमच्या व धर्माच्या मूलभूत अधिकारांमध्ये केलेली ढवळाढवळ आहे असे जमियत उलेमा-ए-हिंदचे म्हणणे आहे. आम्ही निर्णयाशी असहमत आहोत.जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष सिद्दिकुल्लाह चौधरी यांनीही न्यायालयाला व केंद्र सरकारला मुस्लीम पर्सनल लॉमध्ये दखल देण्याचा अधिकार नाही, असे म्हटले आहे. चौधरी पश्चिम बंगालचे शिक्षण विस्तार व ग्रंथालय सेवामंत्री आहेत. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. दिल्लीमध्ये आमच्या केंद्रीय समितीची बैठक होईल. या बैठकीत आम्ही त्यावर चर्चा करून वाटचाल ठरवू', असे ते म्हणाले.तज्ज्ञांशी चर्चा करायला हवी होतीसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इस्लाम, धर्मातील परंपरा व प्रथांची कोणतीही माहिती नसताना हा निर्णय दिला आहे, असा आरोपही चौधरी यांनी केला. न्यायाधीशांनी निर्णय देण्याआधी आमच्या धर्मातील तज्ज्ञांशी चर्चा करायला हवी होती, असे सांगून सिद्दिकुल्लाह चौधरी यांनी 'कुराणमध्ये तिहेरी तलाकचा उल्लेख आहे आणि आम्ही त्याचे पालन करणार', असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करणाºयांवरही त्यांनी टीका केली.
तुम्हाला शिक्षा करायची असेल, तर बिनधास्त करा, पण तलाक प्रथेचे पालन करणारच -मौलाना महमूद मदानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 03:46 IST