आजच्या काळाता प्रामाणिकपणा हा जवळपास दुर्मीळ होत आला आहे. मात्र तरीही कधीकधी प्रामाणिकपणाची काही उदाहरणं समोर येत असतात. कर्नाटकमधील देरलकट्टे येथील राहणारे एम.ए. मोहम्मद यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणासारख्या प्रामाणिकपणाचं उदाहरण तर अधिकच दुर्मिळ आहे. ३५ वर्षांपूर्वी मोहम्मद हे मुदिगेरे तालुक्यामधील कोटिगेहार गावामध्ये कामाच्या निमित्ताने गेले होते. परतत असताना त्यांनी गावामधील जुन्या भारत हॉटेलमध्ये कडुबू आणि माश्यांच्या कालवणाचा आस्वाद घेतला. मात्र हॉटेलमध्ये गर्दी असल्याने तेव्हा ते बिल भरायला विसरले आणि ते थेट मंगळुरूला परतले. गावात पोहोचल्यावर त्यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली. आपण पुन्हा कोटिगेहार येथे गेल्यावर बिल परत करू, असे ठरवले. मात्र नशिबाने त्यांना पुन्हा माघारी परतण्याची संधी मिळाली नाही.
अनेक वर्ष लोटली तरी आपण खाल्लेल्या अन्नाचे पैसे दिले नाहीत, याची सल मोहम्मद यांच्या मनामध्ये बोचत होती. यादरम्यान, शनिवारी ते जेव्हा काम करण्यासाठी कोटिगेहार येथे आले तेव्हा त्यांनां आपली चूक उमगली. तेव्हा ते न चुकता ते ३५ वर्षांपूर्वी बिल न भरता जेवलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. ते हॉटेलही तिथेच होते. तसेच हे हॉटेल तत्कालिन मालकाचा मुलगा अजीज चालवत होता.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मोहम्मद यांनी अजीज यांच्याकडे ३५ वर्षांपूर्वीच्या बिलाचा उल्लेख केला. तसेच आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली. अजीज यांना हे ऐकून आश्चर्य वाटलं. कारण असा प्रकार त्यांनी आधी ऐकला नव्हता. मोहम्मद यांनी जुनं बिल भरलं. त्यानंतर त्याच हॉटेलमध्ये जेवण केलं.