बरेली (उत्तर प्रदेश) : नोकरीसाठी कोणाला काय करावे लागेल, हे सांगता येत नाही. रोजगारासाठी वानराचा आवाज काढावा लागेल, असे सांगितले तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. माकडांचा उपद्रव कमी व्हावा, त्यांना हुसकावून लावता यावे, यासाठी उत्तर प्रदेशमधील बरेली महापालिकेने नोकरी देताना या गोष्टीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत. तरीही माकडांचा उपद्व्याप कमी न झाल्याने महापालिकेने आता नवी शक्कल लढवली आहे. माकडांना हुसकावण्यासाठी त्यांनी ‘लंगूर मॅन’चा शोध सुरू केला आहे. हल्ली माकडे मनुष्याला फारशी घाबरत नाहीत. पण आपल्याच जातीतील लंगूरांना (माकडाचा एक प्रकार) पाहून वा त्यांचा आवाज ऐकून ते धूम ठोकतात. त्यामुळे आता पालिका अधिकारी वानरासारखा आवाज काढतील, अशा लोकांचा शोध घेत आहेत. याआधीही पालिकेने हा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी झाला होता. त्या वेळी बरेलीमधील माकडे पळून गेली होती. त्यामुळेच पुन्हा तोच प्रयोग बरेली शहरात राबवणार आहे. (वृत्तसंस्था)
वानराचा आवाज काढाल तर नोकरी नक्की!
By admin | Updated: May 15, 2016 04:47 IST