नवी दिल्ली - दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे असून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं पारडं जड आहे. सर्वसामान्य माणूस केजरीवाल यांच्याबाजुने असल्याचं दिसून येतंय. म्हणूनच, रिक्षावालेही केजरीवाल यांचा प्रचार करत आहेत. पण, एका रिक्षावाल्यास केजरीवाल यांचा प्रचार चांगलाच महागात पडलाय. कारण, दिल्ली पोलिसांनी संबंधित रिक्षावाल्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना 65 उमेदवारांनी आव्हान दिले आहे. केजरीवालांना आव्हान देणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहे. त्यामध्ये काही वकील तर काही वृत्तवाहिन्यांचे मालक आहेत. त्यामुळे केजरीवाल यांचे समर्थक त्यांचा जोरात प्रचार करत आहेत.