रघुनाथ पांडे , नवी दिल्ली‘महाराष्ट्रात मी अनेकदा गेलो. राहिलो, वाढलोही!! या भूमीबद्दल मला नितांत आदर आहे. मी नांदेडमधून बीएस्सीची पदवी घेतली..आता या राज्याच्या राज्यपाल होत असल्याचा मला अभिमान आहे.’अशा शब्दात आपल्या भावना महाराष्ट्राचे नियोजित राज्यपाल सी.व्ही.राव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.शनिवारी (दि.३०) दुपारी चार वाजता राव हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले. राव यांच्याशी बुधवारी मुंबईतील राजभवनच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. ते दोन दिवस नवी दिल्लीला मुक्काम करणार होते. तशा काही भेटीगाठीही त्यांच्या ठरल्या होत्या. मात्र बदललेल्या कार्यक्रमानुसार ते गुरूवारी हैदराबादला परत जात असून, त्यांना मुंबईस नेण्यासाठी राज्यपालांचे उपसचिव परिमलसिंह, एडीसी डॉ. सौरभ त्रिपाठी हैदराबाद येथे गुरूवारी जात आहेत. स्वत: राव मात्र गणेशचतुर्थीला शपथ घेण्याच्या मानसिकतेत आहेत. सायंकाळी महाराष्ट्र सदनमध्ये ‘लोकमत’शी त्यांनी खास बातचित केली. राव म्हणाले, ‘घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या प्रगतीसाठी जे शक्य आहे ते सारेच करेल. तेथील प्रश्न मला ठावूक आहेत. प्राधान्यक्रम ठरवून राज्याच्या प्रगतीसाठी हातभार लावेल.’ हैदराबाद येथून बुधवारी सकाळी ते राजधानीत आले. दिवसभर त्यांनी भाजपाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. के. शंकरनारायणन यांची महाराष्ट्रातून झालेली बदली व राजीनाम्यानंतर राव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येते. ते वाजपेयी सरकारात गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर आंध्रप्रदेशात भाजपा प्रदेशाध्यक्षही होते.
मी महाराष्ट्रातच शिकलो -नियोजित राज्यपाल राव
By admin | Updated: August 28, 2014 02:30 IST