गुवाहाटी : कितीही अपमानास्पद बोला, मी शिवभक्त आहे. सारे विष गिळून टाकतो; परंतु इतर कुणाचा अपमान झाला तर मला सहन होत नाही, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.
आसाम दौऱ्यात दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दरांग आणि गोलाघाटच्या नुमालीगडमध्ये १८,५०० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण केले. यावेळी दरांग येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
शनिवारी पंतप्रधान मोदी गुवाहाटीत दाखल झाले. विमानतळावरून ते ज्येष्ठ गायक भारतरत्न भूपेन हजारिका यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित बैठकीत सहभागी झाले. मल्लिकार्जुन खरगे यांनी हजारिका यांच्याबाबत ‘मोदी नाचगाणे करणाऱ्यांना भारतरत्न देत आहे’, अशा शब्दांत टीका केली होती. याची आठवण मोदी यांनी करून दिली.
लष्कराऐवजी दहशतवाद्यांचे समर्थन कशासाठी?
भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांचे समर्थन करीत असल्याची टीका करून मोदी म्हणाले, ‘घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत जमीन लाटू देणार नाही. लोकसंख्येचा समतोल बदलण्याचा हा कट कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही.’
ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. याचे समर्थन करण्याऐवजी काँग्रेस घुसखोर व राष्ट्रद्रोही शक्तींचा बचाव करीत आहे, असा आरोपही मोदी यांनी या वेळी केला. माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.
आमच्यासाठी नागरिक देवोभव:
नुमालीगडमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांचे हक्क नाकारण्यात आले. आदिवासींवर अन्याय झाला. आमचा मंत्र ‘नागरिक देवोभव:’ असा आहे. जनता हाच आमच्यासाठी देव. नागरिकांची गैरसोय व्हायला नको म्हणून भाजप सरकार कटिबद्ध आहे.’ एका विशिष्ट वर्गाच्या तुष्टीकरणातून काँग्रेसला सत्ता मिळत होती. भाजपला तुष्टीकरणावर नव्हे, संतुष्टीकरणावर भर आहे, असेही ते म्हणाले.
पूर्वी घुसखोरांना संरक्षण मिळाले : आसाममध्ये घुसखोरांची समस्या मोठी आहे. काँग्रेस सरकारने त्यांना जमिनी दिल्या, संरक्षण दिले. मतांच्या लालसेने आसामची पूर्ण समाजरचना विस्कळीत केली. आता भाजप सरकार आसामच्या लोकांना सोबत घेऊन आव्हानांचा सामना करीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.