लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जीएसटी, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे लोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेत काँग्रेस, द्रमुकसह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाई, जीएसटी, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले.
राज्यसभेतही याच मुद्द्यांवर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटेही व्यवस्थित होऊ शकले नाही. कामकाज एकदा स्थगित करून दुपारी दोन वाजता पुन्हा सुरू झाले. मात्र, महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते. या गदारोळातच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी, पी. टी. उषा यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेतली.
केंद्राच्या विविध विभागांत ९.७९ लाख पदे रिक्त
केंद्र सरकारच्या विविध विभागांत ९.७९ लाख पदे रिक्त असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत बुधवारी दिली. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, एकूण पदांची संख्या ४०.३५ लाख आहे. १ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांत ३०,५५,८७६ कर्मचारी पदांवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत महिन्यात केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांना सांगितले होते की, आगामी दीड वर्षांत मिशन मोडमध्ये १० लाख पदांची भरती केली जावी.
‘जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडले’
- सभापतींनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना आपले मत मांडण्यास सांगितले. खरगे म्हणाले की, महागाई सतत वाढत आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे दर आकाशाला भिडले आहेत. याचा परिणाम सामान्य लोकांवर होत आहे. यामुळे महिलाच नाही तर लहान मुले आणि वृद्ध तसेच देशातील १४० कोटी जनतेला फटका बसला आहे. व्यंकय्या नायडू यांनी त्यांना मध्येच थांबवत सांगितले की, आपणास केवळ मुद्दा उपस्थित करण्यास सूचविले आहे. मात्र, खरगे हे आपले म्हणणे मांडत राहिले.
- ते म्हणाले, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. गहू, तांदूळ, डाळी, लस्सी, पनीर आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यानंतर सभापतींनी पुन्हा एकदा खरगे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधी पक्षांचे सदस्य आणखी आक्रमक झाले आणि गदारोळ सुरु झाला.