सूरत : सात दिवसांवर मतदान आलेल्या दक्षिण गुजरातमधील सूरत शहरात आता प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. भाजपा विकास, हिंदुत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढे करून मतदारांना आकर्षित करीत आहे. तर आम आदमी पार्टी दिल्लीच्या शाळा, मोफत वीज आणि महिलांना सन्मान वेतन देण्याची स्वप्न विकते आहे. काँग्रेस मात्र अद्यापही आपल्या जुन्याच शस्त्रांसह लढते आहे.
सूरत अर्थात टेक्सटाईल आणि डायमंड सिटीच राहिली नसून ते आता उड्डाणपुलाचे शहरही झाले आहे. ४८ लाख लोकसंख्येच्या या शहरात तब्बल १२ लाख लोक टेक्स्टाईल उद्योगात आहेत. जवळपास २०० कापड कंपन्या आहेत. ७० हजाराहून अधिक कपड्यांची, शोरुम, दुकाने शहरात आहेत. तेवढाच मोठा उद्योग हिरे व जड जवाहरतीचा आहे.
गेल्या २७ वर्षापासून हे शहर भाजपने एक हाती ताब्यात ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत १६ पैकी १५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आतापर्यंत पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात येऊन गेले आहेत. काँग्रेस मात्र यंदा आपमुळे काहीसा धोक्यात आल्याचे दिसतो.
सूरत महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपने भाजपाला टक्कर देत २७ जागा हस्तगत केल्या व सभागृहात विरोधी पक्षाची जागा पटकावली. तेथूनच आपच्या राजकीय इच्छा जागृत झालेल्या आहेत.
सूरतमध्ये पावला पावलावर महाराष्ट्र...- सूरतमध्ये सूरती, गुजराती, हिंदी व मराठी भाषा बोलली जाते येथे पाऊला पाऊलावर महाराष्ट्र माणूस भेटतो. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातून धुळे, जळगाव आदी भागातून मोठ्या संख्येने महाराष्ट्र माणूस येथे रोजगाराच्या शोधात आला आहे. - रिक्षाचालक नानाभाई धोंडखेडे हे गेल्या २५ वर्षापासून येथे रिक्षा चालवतात. ते म्हणतात, यावेळेस आपची हवा आहे, पण येईल भाजपच. - सरदार पटेल भाजी मार्केटमध्ये भेटलेला दीपक गोबा पाटील हा तरुण चोपडा तालुक्यातून गेल्या २० वर्षांपूर्वी सूरतला आला. त्यालाही मतदारसंघात आपचा प्रभाव जाणवतोय. - या दोघांनीही काँग्रेसला यंदा काहीच मिळणार नाही असे भाकीत वर्तवले.