लखनौ : पाकिस्तानने दहशतवादाच्या आडून भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले असल्याचा आरोप कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी केला आणि देशापुढील हे एक मोठे आव्हान असल्याचेही स्पष्ट केले.येथे आयोजित एका परिषदेत ‘भारताची प्रगती, सुरक्षा स्थिती आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते. दहशतवादाविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीसोबत (यूएई) सहकार्य आणि गोपनीय सूचनांच्या देवाणघेवाणीबाबत समझोत्याचा उल्लेख करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही या मुद्यावर अनेक देशांना विश्वासात घेतले असून राजनैतिक उपायही केले जात आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे; परंतु भारताकडूनही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे, याकडे लक्ष वेधताना सिंह म्हणाले, पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या देशाच्या सीमा अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने सुरक्षा बंदोबस्तही चोख ठेवला जातो. नेपाळ आणि भूतानलगतच्या सीमांवर कुठलीही समस्या नसली तरी बांगलादेश आणि म्यानमारची सीमा सक्रिय आहे. काय म्हणाले गृहमंत्रीरालोआ सरकार सत्तेत आल्यापासून जम्मू-काश्मीर सीमेवर घुसखोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. २०१३ साली घुसखोरीच्या २७७ आणि २०१२ मध्ये २६४ घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत फक्त १५ घटनांची नोंद आहे. जगभरात थैमान घालणारी इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात कदापि पाळेमुळे रोवू शकणार नाही आणि याचे संपूर्ण श्रेय या देशातील मुस्लिमांना आहे. भारताच्या वाढत्या सामरिक शक्तीने राष्ट्रविरोधी घटक त्रस्त झाले आहेत. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध
By admin | Updated: September 28, 2015 01:57 IST