हॅलो ३ : विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी
By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST
मांद्रे मतदारसंघ : मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा
हॅलो ३ : विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी
मांद्रे मतदारसंघ : मुदतपूर्व निवडणुकीची चर्चामोरजी : विधानसभेच्या निवडणुकांसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी असला तरीही मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे.मांद्रे मतदारसंघाचे आमदार हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांचे मांद्रे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले. पूर्वी जसा ते मतदारसंघाला वेळ देत होते, तसा ते आता देऊ शकत नाहीत हे मुख्यमंत्रीही मान्य करतात. मुख्यमंत्र्यांचे जरी मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले तरीही या मतदारसंघात जी भाजपाची संघटना आहे, तशा पद्धतीची संघटना कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाही. भाजपाने जरी कोणत्याही क्षणी हाक मारली तरी शेकडो कार्यकर्ते जमा होतात ही भाजपाच्या जमेची बाजू आहे.इच्छुकांची यादीया मतदारसंघातून माजी आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, युवा नेते सचिन गोपाळ परब, उद्योजक बाबी बागकर, मॉर्गन त्रावासो, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, राजन साटेलकर याशिवाय माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, दीपक कळंगुटकर, उमेश तळवणेकर यांच्या नावाची चर्चा आहे.काँग्रेसच्या उमेदवारीवर माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, बाबी बागकर, डॅनियल डिसोझा यांनी दावा केलेला आहे. दुसर्या बाजूने भाजपामधून आलेले माजी आमदार दयानंद सोपटे यांनाही पुन्हा उमेदवारी द्यावी, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष लुईिझन फालेरो यांच्याकडे तगादा लावला आहे; परंतु फालेरो यांचे कर समर्थक हे जितेंद्र देशप्रभू समजले जातात. मागच्या आठवड्यात जी हरमलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यात अधिकाधिक कार्यकर्ते हे देशप्रभू यांचे समर्थक होते. त्यात डॅनियल डिसोझा, विजयालक्ष्मी नाईक, विष्णू केरीकर, पांडुरंग नाईक यांचा समावेश होता. त्याच दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पेडणे येथे झाली, त्या बैठकीला देशप्रभू फिरकलेही नसल्याचे कळते.सोपटेंच्या संपर्कात दोन पक्षमाजी आमदार दयानंद सोपटे आतापासून मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. दोन राष्ट्रीय पक्ष व एका स्थानिक पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याची तयारी चालवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या संदर्भात माजी आमदार सोपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, आपण कोणत्या पक्षाकडे जावे व निवडणूक लढवावी हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ठरवू.दरम्यान, गत विधानसभा निवडणुकीत सोपटे यांना भाजपामध्ये आणून त्यांना बळीचा बकरा केले. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या विजयासाठी नव्हे तर पराभवासाठी प्रयत्न केले. त्यानंतर गेल्या वर्षी सोपटे काँग्रेस पक्षाचा त्याग करून तटस्थ राहिले. काँग्रेसचा एक गट त्यांना पक्षात पुन्हा आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र, सोपटे यांना काँग्रेसने प्रवेश दिल्यास माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, ॲड. रमाकांत खलप, बाबी बागकर काम करणार नाहीत. ....तर पुरुषांचे पत्ते कट?आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची चर्चा आहे. तसे झाले तर अनेक मतदारसंघांत पुरुष आमदार, उमेदवारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. हे व्हायला नको म्हणून मुदतपूर्व निवडणुका घेण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.भाजपात एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तर दुसरा इच्छुक उमेदवार पुढे येत नाही. मात्र, काँग्रेस पक्षात तशी शिस्त नाही. बंडखोरी करून पक्षाच्या उमेदवाराला पाडून भाजपाच्या उमेदवाराला विजयी करणे ही स्थानिक नेत्यांची रणनीती आहे.शिवसेनेतर्फे मॉर्गन त्रावासोदेशात भाजपा व शिवसेनेची युती असली तरी गोव्यात युतीचा धर्म शिवसेना पाळत नाही. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे की भाजपाने आपली पोळी भाजून शिवसेनेच्या नेत्यांना चिरडण्याचा प्रयत्न चालवला आहे. उत्तर गोवा जिल्हा प्रमुख आनंद शिरगावकर हे तर प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात विद्यमान भाजपा सरकारवर टीका करीत असतात. यंदा शिवसेनेने मांद्रे मतदारसंघातील निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि शिवसेनेतर्फे मॉर्गन त्रावासो यांना उमेदवारी देण्याचेही निश्चित केले आहे.शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुख व राज्य प्रमुख अनुक्रमे प्रदीप बोरकर व ॲड. अजितसिंग राणे यांनी केरी-पेडणे येथे शिवसेना मेळावा झाला त्या वेळी मॉर्गनसारखे वाघ विधानसभेत शिवसेनेमार्फत निवडून येण्याची गरज प्रतिपादली होती. त्यामुळे शिवसेना आगामी निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून भर देताना त्रावासोंच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे चित्र दिसते.शिवसेनेतर्फे मॉर्गन त्रावासो यांची निवड निश्चित आहे. तर मगोच्या उमेदवारीसाठी श्रीधर मांजरेकर इच्छुक आहेत. भाजपा-मगो युती असली तरी जिल्हा पंचायत निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून मगोने युतीचा धर्म पाळला नाही. मगोच्या श्रीमती मांजरेकर यांना निवडून आणून भाजपाच्या माया शेटगावकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.विधानसभेच्या निवडणुकीतही मगो पक्ष स्वबळावर निवडणुका लढतो की काय हे आगामी काळात दिसून येणार आहे. माजी आमदार दयानंद सोपटे यांनाही मगो पक्षात आणून उमेदवारी देण्याची तयारी चालवली आहे. मांद्रे मतदारसंघातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना वाली उरलेला नाही.