PM Modi on GST Reform: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांशी संबोधित करताना या नव्या जीएसटी दर प्रणालीची माहिती दिली आहे. हा बचत उत्सव असून याचा सर्वांना मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू होणार आहे. एक प्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे. या उत्सवात तुमची बचत वाढणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तूंना आणखी सोप्या पद्धतीने खरेदी करू शकाल. आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय लोक, तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वांना या बचत उत्सवाचा मोठा फायदा होणार आहे. सणांच्या काळात सगळ्यांचे तोंड गोड होणार आहे. देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे. मी देशातल्या सर्व कुटुंबांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे रिफॉर्म भारताच्या विकासाला गती देणार आहेत. व्यापार आणखी सोपे होतील. प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
देश आता डझनभर करांपासून मुक्त
"२०१४ मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सेवा देण्याची संधी दिली, तेव्हा आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी जीएसटीला आमचे प्राधान्य दिले. आम्ही प्रत्येक भागधारकाशी चर्चा केली, प्रत्येक राज्याच्या चिंता दूर केल्या आणि प्रत्येक प्रश्नाचे निराकरण केले. स्वतंत्र भारतातील प्रमुख कर सुधारणा सर्व राज्यांना सहभागी करून घेणे शक्य झाले. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांचेच हे फळ होते की देश आता डझनभर करांपासून मुक्त झाला आहे. एक राष्ट्र, एक करचे स्वप्न साकार झाले आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
९९ टक्के वस्तूंवर आता फक्त ५ टक्के कर
"जीएसटी कपातीमुळे, आता नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. बहुतेक दैनंदिन वस्तू अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. ९९ टक्के वस्तूंवर आता फक्त ५ टक्के कर आकारला जाईल. यामुळे मध्यमवर्गीयांचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा होत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. जीएसटी दर कमी केल्याने त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. सुधारणा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. काळ आणि गरजा बदलतात. म्हणूनच, देशाच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू केल्या जात आहेत. हे बदल सर्वांना दिलासा आणि संधी देतील," असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं.
गेल्या ११ वर्षांत २५ कोटी लोकांची गरिबीवर मात
"या निर्णयामुळे गरीब, नव-मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना दुहेरी फायदा होत आहे. जीएसटीमध्ये कपात केल्याने नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. घरांपासून ते स्वप्नातील खरेदीपर्यंत सर्व गोष्टींवर खर्च कमी होईल. प्रवास आणि खरेदी स्वस्त होई, कारण बहुतेक हॉटेल खोल्यांवरही जीएसटी कमी करण्यात आला आहे. गेल्या ११ वर्षांत, जवळजवळ २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे आणि नवीन मध्यमवर्गाने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावली आहे. या वर्षी, सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर कमी केले, ज्यामुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला. आता, जीएसटीमध्ये कपात केल्याने घरे, वाहने आणि प्रवासावरील खर्च कमी होईल, ज्यामुळे नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
नागरिक देवो भव
"जीएसटी सुधारणांबद्दल दुकानदार उत्साही आहेत याचा मला आनंद आहे. ते त्याचे फायदे ग्राहकांना देण्यासाठी काम करत आहेत. "नागरिक देवो भव" या मंत्राने आम्ही पुढे जात आहोत. पंतप्रधानांनी देशवासीयांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांच्या अंमलबजावणीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की हे पाऊल नागरिकांच्या जीवनात साधेपणा आणि बचत आणेल, असं पंतप्रधान म्हणाले.
अभिमानाने सांगा की मी स्वदेशी वस्तू खरेदी करतो
"ज्याप्रमाणे स्वदेशीच्या मंत्राने देशाच्या स्वातंत्र्याला बळकटी दिली, त्याचप्रमाणे स्वदेशी आज देशाच्या समृद्धीलाही बळकटी देईल. आज अनेक परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपल्या खिशातील कंगवा परदेशी आहे की भारतीय हे आपल्याला माहित नाही. आपण यापासून मुक्त होऊन फक्त अशाच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत ज्या मेड इन इंडिया आहेत. प्रत्येक घर आणि प्रत्येक दुकान स्वदेशीचे प्रतीक बनले पाहिजे. अभिमानाने म्हणा - मी स्वदेशी खरेदी करतो. मी स्वदेशी वस्तू विकतो. जेव्हा हे होईल तेव्हा भारताचा वेगाने विकास होईल," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.