खा. दर्डांच्या प्रश्नावर खुलासा : ताण दूर करण्यासाठी प्रयत्नशील - स्मृती इराणी
नवी दिल्ली : परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या कमी गुणांमुळे आत्महत्या करणाऱ्या वैफल्यग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या सरकारकडे उपलब्ध नसल्याची माहिती केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्य तथा लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मंगळवारी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अशा प्रकारचे आकडे सरकारकडे नसतात, असे इराणी म्हणाल्या.त्या म्हणाल्या, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांबाबत मीडियामार्फत माहिती मिळत असते. असे असले तरी अशी आकडेवारी सीबीएसईदेखील ठेवत नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये परीक्षेच्या दडपणाखाली किती विद्यार्थ्यानी आपले जीवन संपविले, योग्य उत्तर असताना पेपर तपासताना कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्येचा मार्ग पत्कारणे हे देखील आत्महत्येचे कारण असू शकते काय, शिवाय विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी सरकारकडे काही उपाययोजना आहेत काय, हे तीन प्रश्न खासदार विजय दर्डा यांनी विचारले होते.