नवी दिल्ली : तीन सत्रांच्या तेजीनंतर बुधवार आणि गुरुवार अशा सलग दोन सत्रांत शेअर बाजारांत पुन्हा एकदा घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या उपाययोजना प्रभावहीन ठरल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ५७२.३४ अंकांनी, तर निफ्टी १५७.0५ अंकांनी घसरला. दरम्यान, बरोजगारी ४५ वर्षांच्या नीचांकावर गेल्यामुळे किरकोळ कर्जाच्या अनुत्पादक भांडवलातही (एनपीए) आता वाढ झाल्याचे समोर आले आहे.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मोठ्या उपाययोजनांची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यानंतर शेअर बाजारांनी उसळी घेतली होती. तथापि, या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. गुरुवारीही बाजार घसरले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.‘जेफरीज अॅण्ड एडेलविस ब्रोकिंग लि.’ या संस्थेने म्हटले की, सरकारचा ‘बुस्टर डोस’ नजीकच्या भविष्यात मागणी वाढविण्यास पुरेसा नाही, हे स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ भारताच्या आर्थिक आघाडीवरील चिंता कायम असून शेअर बाजार आणि रुपयाला त्याचा फटका बसणे अटळ आहे. रुपया तर या महिन्यातच आशियातील सर्वांत वाईट कामगिरी करणारे चलन ठरला आहे. ‘आयडीबीआय कॅपिटल मार्केट सर्व्हिसेस लिमिटेड’चे संशोधन प्रमुख ए. के. प्रभाकर यांनी सांगितले की, जीडीपी वृद्धीदर ६ टक्क्यांच्या खाली आल्यास सरकारकडून आणखी प्रोत्साहन उपाय केले जाऊ शकतात. रिझर्व्ह बँकेलाही धोरणात्मक व्याजदरांत कपात करणे भाग पडेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर आधीच कपात करून नऊ वर्षांच्या नीचांकावर आणले आहेत.
देशातील बँकांना ७१ हजार ५४२ कोटींचा गंडागेल्या आर्थिक वर्षात देशातील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक उघडकीस आली आहे. त्यानुसार वर्षभरात देशात फसवणुकीचे सुमारे ६ हजार ८०१ प्रकारसमोर आले व यातून ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.