Asaduddin Qwaisi: बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरुन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मतदार यादीतील घोळ आणि पहलगाम हल्ल्यवरुन केंद्रावर जोरदार निशाणा साधला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे आणि 'ऑपरेशन सिंदूर' चालू ठेवले पाहिजे असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला होता. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार निवडणुकीशी याचा संबंध जोडत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हटले. बांगलादेशी-रोहिंग्या बिहारमध्ये असल्याचे आपल्याला कळतं, पण दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे आम्हाला माहित नाही, असं म्हणत ओवैसींनी टीका केली. तेलंगणाच्या निजामाबादमध्ये एका सभेत ओवैसी बोलत होते.
"जर तुम्हाला या देशावर प्रेम असेल तर मला भाजपवाल्यांनो सांगा की हे सत्य नाही का भारताला खरा धोका पाकिस्तानपासून आहे, भारताला धोका चीनपासून आहे. चीन आणि पाकिस्तान बांगलादेशात घुसले आहेत. देशाला ज्यांच्याकडून धोका आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, तुम्ही देशात काय करत आहात? चीन भारताला सर्व बाजूंनी वेढत आहे. बांगलादेश सीमेवर, चीन बांगलादेशच्या लोकांसाठी एक हवाई पट्टी बांधत आहे. भारतातून उभे राहून पाहू शकता. भारताचा शत्रू आपल्या दारावरआहे आणि आता भारतात कोणीतरी म्हणत आहे, हे करू नका, ते करू नका, घर पाडा, बुलडोझर चालवा, मशीद उखडून टाका, हे काय सुरु आहे?," असा सवाल असदुद्दीन ओवैसींनी केला.
"पहलगाममध्ये आपल्या २६ हिंदू बांधवांना चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले आणि तिथले राज्यपाल आता जुलै महिन्यात म्हणत आहेत की मी जबाबदार आहे. जर तुम्ही जबाबदार असाल तर पद सोडून द्या आणि निघून जा. दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले? तुम्ही म्हणता की बिहारमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या आहेत, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे. मग ते चार दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे मला सांगा, तुम्ही झोपला होता का? तुमचे प्रशासन डोळे मिटून बसले होते. जेव्हा तुम्ही मतदार यादीच्या नावाखाली बांगलादेशी रोहिंग्या आहेत म्हणता, तेव्हा पहलगामचा बदला घ्यावा लागेल आणि ऑपरेशन सिंदूर चालू ठेवावे लागेल. जोपर्यंत ते चार दहशतवादी पकडले जात नाही, जोपर्यंत ते मारले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाब विचारत राहू," असंही ओवैसी म्हणाले.