नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असताना आता रोजगाराच्या आघाडीवर सरकारच्या समस्या वाढल्या आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत विविध राज्यांमध्ये निर्माण झालेल्या रोजगारांची आकडेवारी समोर आली आहे. देशात रोजगार निर्मितीची समस्या नसल्याचा दावा मोदी सरकारनं अनेकदा फेटाळला आहे. मात्र सरकारी आकडेवारीनंच आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) ३१ ऑक्टोबरपर्यंत पीएमईजीपीच्या अंतर्गत देशात केवळ २,११,८४० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्रिपुरा, केरळ, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, गुजरात यांची कामगिरी अतिशय सुमार असल्याचं आकडेवारी सांगते. 'एनडीटीव्ही'नं सरकारी कागदपत्रांच्या आधारे याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत त्रिपुरात एकाही व्यक्तीला रोजगार मिळालेला नाही. तर केरळमध्ये केवळ ७२, जम्मू-काश्मीरमध्ये २१६, गुजरातमध्ये २६४, तेलंगणात २५६, राजस्थानात ३१२ आणि दिल्लीत ३६८ जणांना रोजगार मिळाला आहे. पंजाब, झारखंड, छत्तीसगड आणि लक्ष्यद्वीपमधील परिस्थितीदेखील फारशी चांगली नाही. या राज्यांमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत रोजगार प्राप्त झालेल्यांचं प्रमाण ५०० ते २००० च्या दरम्यान आहे. तर महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात (३१ ऑक्टोबरपर्यंत) ६४८८ रोजगार निर्माण झाले आहेत.
अबकी बार, रोजगारात किरकोळ वाढ; गुजरातची कामगिरी अतिशय सुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 22:21 IST