ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - वॉट्स अॅप विकत घेण्यात अपयशी ठरलेल्या गुगलने आता वॉट्स अॅपला टक्कर देण्यासाठी नवीन मोबाईल मेसेजिंग अॅप सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. २०१५ मध्ये हा मेसेजिंग अॅप भारतामध्ये लाँच केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुगलने वॉट्स अॅप विकत घेण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. यासाठी गुगलने १० अब्ज डॉलर्स (६० हजार कोटी रुपये) देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र फेसबुकने तब्बल १९ अब्ज डॉलर्स (१ लाख २० हजार कोटी रुपये) मोजून वॉट्स अॅप विकत घेत गुगलवर मात केली. यानंतर आता गुगलने स्वतःचा मोबाईल मेसेजिंग अॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला असून गुगगलचे प्रॉडक्ट मॅनेजर निखील सिंघल हे या अॅपच्या अभ्यासासाठी भारतात आले होते असे सूत्रांनी सांगितले. गुगलच्या या अॅपमध्ये व्हॉईस टू टेक्स्ट आणि भारतीय भाषा हे प्रमुख फिचर्स असतील असे समजते. २०१५ मध्ये भारतात हा अॅप लॉंच केला जाईल व अॅप नि:शुल्क उपलब्ध असेल. या अॅपसाठी जीमेलचे अकाऊंट असणे बंधनकारक नसेल. युझर्सच्या मोबाईल नंबरद्वारेच अॅपशी कनेक्ट करता येणार आहे. मात्र वॉट्स अॅप, हाईक, टेलिग्राम, वी चॅट, व्हायबर अशी असंख्य अॅप सध्या उपलब्ध असल्याने गुगलचा अॅप कितपत यशस्वी होईल याविषयी जाणकार शंका व्यक्त करत आहेत.