भगवानपूर.....
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
भगवानपुरात दारुबंदीसाठी जागर
भगवानपूर.....
भगवानपुरात दारुबंदीसाठी जागरग्रामस्थ व महिलांचा पुढाकार : दारुविक्री बंदच्या निर्णयामुळे गावात उत्साह संचारला भगवापूर : भिवापूर तालुक्यातील भगवानपूर येथे अवैध दारुविक्रीला गावातील महिला व ग्रामपंचायत प्रशासनाने तीव्र विरोध दर्शविला आहे. गावात दारुविक्री बंद व्हावी, यासाठी महिला, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी जनजागृती अभियान राबविले. याची फलश्रुती म्हणून ग्रामसभेने दारुविक्री बंदचा ग्रामसभेत ठराव घेतला. या निणर्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.भगवानपूर गावात मागील १०-१२ वर्षांपासून काही मंडळी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत होती. त्यामुळे गावातील तरुण व प्रौढ ग्रामस्थ दारूच्या आहारी गेली होती. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भांडण, तंटे वाढल्याने गावातील वातावरण दूषित झाले होते. शिवाय, दारूच्या विक्रीमुळे गावात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला. लहानसहान कारणांवरुन भांडणे व्हायची. गावातील एकोपा दुरावत असल्याने नागरिक व महिला वर्गात कमालीचा संताप होता. या समस्येसाठी अनेकदा पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या. मात्र, दारू विक्रेत्यांच्या वरदहस्तामुळे कुठलीच कारवाई होत नव्हती. परिणामी महिला व नागरिक त्रस्त होते. या समस्येवर मात करण्यासाठी गावातील बचत गटाच्या महिलांनी कंबर कसली. सरपंच सुभाष राऊत यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेत महिलांनी गावातील दारुविक्रीला तीव्र विरोध दर्शवित दारूविक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी रेटून धरली. यावर ग्रामसभेत अवैध दारुविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. गावातील तरुणांच्या अध्यक्षतेखाली दारुबंदी समितीची स्थापना करण्यात आली. अवैध दारुविक्रीच्या विरोधात गावात जनजागृती अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व स्व. भगवान नारनवरे विद्यालयातील विद्यार्थी, महिला, तरुण, प्रौढ व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाने गावात मिरवणूक काढून दारुबंदीसाठी जागर मांडला. बॅण्ड पथकाच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य मार्गाने प्रभातफेरी काढून जनजागृती केली. विविध पथनाट्ये सादर करून व्यसनाधीन लोकांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या जनजागृती रॅलीचे ग्रामपंचायत प्रांगणात सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दारूबंदीच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. (वार्ताहर)